वॉलमार्टचे भारतात प्रवेशासाठीचे लॉबिंग सुरूच

वॉशिग्टन / नवी दिल्ली दि.४ – अमेरिकेतील रिटेल क्षेत्रातील जायंट वॉलमार्ट कंपनीने भारतातील प्रवेशासाठी अमेरिकन लॉ मेकर्सबरोबर सुरू केलेले लॉबिंग सुरूच ठेवले असून त्यावर २०१२ सालातच तब्बल ६.१३ दशलक्ष डॉलर्स (३३ कोटी रूपये )खर्च केले असल्याचे कंपनीच्या लॉबिंग रेकॉर्डवरून दिसून आले आहे. भारत सरकारने वॉलमॉर्टने भारतात प्रवेशासाठी केल्या जात असलेल्या अमेरिकन लॉबिंग मध्ये घोटाळा असल्याने त्याची चौकशी गेली जावी अशी मागणी केली आहे. कारण या लॉबिंग प्रकरणामुळे भारतात राजकीय वादविवादांचे पेव फुटले आहे.

वॉलमार्टने मात्र आपल्या भारत प्रवेशासाठी केल्या जात असलेल्या लॉबिंगला भारतातील राजकारणी, भारत सरकार, सरकारी अधिकारी यांच्याशी कांहीही देणेघेणे नसून आपण केवळ आपल्या व्यवसायाचाच विचार करत आहोत असे जाहीर केले आहे. वॉलमार्टने गेले वर्षभर भारतातील प्रवेशासंबंधीच्या विविध विषयांवर सतत लॉबिंग सुरू ठेवले असून त्यात भारतातील एफडीआयवरही चर्चा घेतली आहे. २००८ पासूनच भारतात प्रवेशासाठी कंपनी उत्सुक असून तेव्हापासून लॉबिंगवर ३४ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १८० कोटी रूपये खर्च केले असल्याचेही अहवालावरून दिसून आले आहे.

अमेरिकेत लॉबिंग ला कायदेशीर मान्यता आहे. मात्र प्रत्येक तिमाहीत कंपनीने त्यासाठी किती खर्च केला याची माहिती प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणेच वॉलमार्टचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. वॉलमार्टची जागतिक उलाढाल ४४४ अब्ज डॉलर्सची आहे. आंतरराष्ट्रीय रिटेल कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत कारण तज्ञांच्या मते भारताची बाजारपेठ अंदाजे ५०० अब्ज डॉलर्सची असून २०२० पर्यंत ती १ ट्रीलीयन डॉलर्सवर जाईल असे संकेत मिळत आहेत.

Leave a Comment