‘सायली ड्रीम व्हेंचर्स’ची पहिलीच निर्मिती असलेल्या मनाली सावंत निर्मित आणि मनोहर सरवणकर दिग्दर्शित ‘मात’ या मराठी चित्रपटातील दोन गाण्यांच्या चित्रीकरणासाठी कोकणच्या परिसराची निवड निर्माते, दिग्दर्शकांनी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
‘मात’ या चित्रपटात फक्त दोनच गाणी असून या गाण्याच्या चित्रीकरणात ईशा कोप्पीकर आणि समीर धर्माधिकारी भाग घेणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटात काम करताना आलेला अनुभव अप्रतीम असल्याचे ईशा कोप्पीकरने अनेकदा बोलून दाखवत आपण युनिटवर खूश असल्याचेही संकेत दिले आहेत. मूळची गोव्याची असल्याने आपल्या पहिल्या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी निर्माते, दिग्दर्शकाने कोकणची निवड केल्याने खूपंच आनंद झाल्याचे ईशाने सांगितले. कोकणातल्या निवती, भोगवे, वेंगुर्ला बंदर या समुद्रकिना-यावर आणि केळूस व म्हापण या ठिकाणी गाण्याचे हे चित्रिकरण होणार आहे. गीतकार संदीप खरेंनी लिहिलेल्या या अर्थपूर्ण गीताचे शब्द आहेत – ‘दोन पाऊलांखालती झाली एकरूप वाट’. या गीताला सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले असून बेला शेंडे आणि ऋषीकेश रानडे यांच्या आवाजात ते रेकॉर्ड केले गेले आहे.
या चित्रपटातल्या गाण्याच्या चित्रीकरणासाठी कोकणचीचं निवड का; या विषयी माहिती देताना दिग्दर्शक मनोहर सरवणकर म्हणाले की; आमच्या निर्मात्यांसोबत संपूर्ण युनिट कोकणातले आहे. त्यामुळे प्रत्येकालाच कोकणची खडानखडा माहिती आहे. कोकणचे सौंदर्य प्रत्येकालाच नेहमीच भुरळ घालीत असते. चित्रपटातील गाण्यासाठी खास अशा; सगळ्यांना प्रेमात पाडणा-या लोकेशन्सची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्याय महत्वाचा वाटला नाही.
तेजस्विनी पंडीत यांच्या ‘सेतू’ या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘मात’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन संभाजी सावंत यांनी केले आहे. गीतकार संदीप खरेंच्या गीतांना संगीतकार सलील कुलकर्णी यांनी संगीत दिले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर निर्मल जानी ‘मात’चे छायांकन करीत असून कलादिग्दर्शन संतोष फुटाणेंचे आहे. ईशासोबतच समीर धर्माधिकारी आणि इतर लोकप्रिय कलावंताच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत.