पंतप्रधान पदावरून जाहीर विधाने करू नका: राजनाथ सिंह

नवी दिल्ली: पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बिघाडी होण्याची लक्षणे दिसू लागल्याने अखेर भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांना कठोर भूमिका घेणे भाग पडले आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून कोणतेही जाहीर वक्तव्य करू नका; असे आदेश त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिले आहेत.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित करावे; अशी मागणी करून नव्या वादाला तोंड फोडले. त्यांच्या विधानानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि खुद्द भाजपमध्येच पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून तू- तू; मैं मैं सुरू झाले.

मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे; ही जनतेची इच्छा असल्याचे विधान करून सिन्हा यांनी मोदींची तळी उचलल्यानंतर मोदींना कडवा विरोध असणार्या जनता दलाकडून (यु) तीव्र प्रतिक्रिया उमटली. ज्येक्क्ष विधिज्ञ आणि भाजप नेते राम जेठमलानी यांनी मंगळवारी सिन्हा यांचीच री ओढली आणि शिवसेनेने पुन्हा एकदा लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज याच पंतप्रधान पदासाठी सर्वात लायक उमेदवार असल्याचे जाहीर करून वादात काडी टाकली.

जनता दलाकडून या मागणीवर तिखट प्रतिक्रिया उमटली. मोदींच्या नावाला आमचा तात्विक विरोध आहे. यशवंत सिन्हा काही आमचे हेडमास्तर नाहीत; की आम्ही त्यांचे सगळे ऐकावे; अशा शब्दात जनता दलाचे नेते अली अन्वर यांनी सिन्हा यांची खिल्ली उडविली. हे सगळे जण आत्ता ‘खयाली पुलाव’ पकवंत बसले आहेत. रालोआच्या बैठकीतंच पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरेल; असेही ते म्हणाले.

रालोआमधील भाजपचा महत्वाचा साथीदार असलेल्या जनता दलाचा विरोध माहित असूनही सिन्हा यांनी पंतप्रधान पदासाठी त्यांचे नाव सुचविले. मोदी हे १०० टक्के धर्मनिरपेक्ष असल्याचे प्रमाणपत्र देऊन जेठमलानी यांनी मोदींना त्यांचे विरोधक जाणून बुजून बदनाम करीत असल्याचे सांगितले. पंतप्रधान पदासाठी लवकरात लवकर मोदींचे नाव जाहीर करावे; अशी मागणीही जेठमलानी यांनी केली. त्याचा ओघात अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मची पूर्ती होऊ न शकलेल्या नितीन गडकरींच्या बाबतीत मी बोललो तेच खरे ठरले; अशी कोपरखळी मारायला जेठमलानी विसरले नाहीत. पुन्हा हे सगळे आपण एक व्यक्ती म्हणून बोलत आहोत. याच्याशी पक्षाचा संबंध नाही; असा वकिली बचावही त्यांनी केला.

दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द आम्हा शिवसैनिकांसाठी अंतिम शब्द असतो; असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुषमा स्वराज यांची भलामण केली. सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान पदासाठी स्वराज याच सर्वोत्कृष्ट उमेदवार असल्याचे ते म्हणाले. मात्र मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे आल्यास त्याला शिवसेना विरोध करणार नाही; असे स्पष्टीकरणही राऊत यांनी दिले.