चेन्नई: विश्वरूपम या चित्रपटावर तामिळनाडू सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात या चित्रपटाचा निर्माता अभिनेता कमल हसन याने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु तामिळनाडू सरकारने ही बंदी मागे घेतल्याने त्याने आता आपली उच्च न्यायालयातील याचिकाही मागे घेतली आहे.
सोमवारी न्या. एस. राजेश्वरन यांच्या खंडपीठापुढे या याचिकेची सुनावणी होणार होती. परंतु या चित्रटाच्या वादाविषयी मुस्लिम संघटना आणि कमल हसन यांच्यात तडजोड झाल्याने मुस्लिम संघटनांनी या चित्रपटाला असलेला आपला विरोध मागे घेतला आहे. त्यामुळे कमल हसन याच्या वतीने कोर्टात अर्ज दाखल करून ही याचिका मागे घेण्यात आली.
दरम्यान; या चित्रपटावरील बंदी मागे घेण्यात आली असली तरी अजून हा चित्रपट तामिळनाडूत प्रकाशित झालेला नाही. तो कधी होणार या विषयी कमल हसनच्या चाहत्यामध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रटातील काही संवादांना कात्री लाऊन तो पुन्हा प्रकाशित केला जाणार आहे. तो साधारणपणे ८ फेब्रुवारीला प्रकाशित होईल असा अंदाज आहे.