पाण्यासाठी भटकंती

waterकमी पाऊस झाल्याने यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाडयातील दुष्काळी स्थिती भयावह आहे. अजून उन्हाळा सुरु व्ह्याचा आहे त्यापूर्वीच येथील नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. मराठवाडयातील जवळपास पाच हजार गांवामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील एकूण ८१ मोठ्या सिंचन प्रकल्पांपैकी ११ प्रकल्प मराठवाड्यात आहेत. सध्या या सर्व ११ मोठ्या प्रकल्पांत जेमतेम १० टक्के एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी हा साठा ४५ टक्के होता. दुसरीकडे मात्र मराठवाड्यात चाराटंचाई त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र असताना राज्य शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्त जनतेबद्दल दुर्लक्ष व्यक्त करून हतबलता दाखवून दिली आहे.

मराठवाडयातील जालना, औरंगाबाद , बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई अभूतपूर्व आहे. काही जिल्ह्यात तर वार्षिक अपेक्षित सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने तलाव , विहिरी आणि हातपंपाना पाणीच नाही. येथील सर्वच मध्यम , लघू आणि अन्य सर्व तलावांत ऐन पावसाळ्यात सरासरी दोन टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा नव्हता. मराठवाड्यातील मोठे , मध्यम , लघू प्रकल्प आणि गोदावरी-मांजरा नदीवरील बंधारे इत्यादींची संख्या ८२० आहे. परंतु , या सर्वांत सध्या सरासरी १५ टक्केही पाणीसाठा नाही.

मराठवाड्यातील २७ तालुक्यांतील भूजल पातळी गेल्या काही वर्षांत सरासरी तीन मीटरने खाली गेली आहे. जालना , औरंगाबाद आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतील प्रत्येकी सात तालुक्यांत भूजल पातळी सरासरी तीन मीटरने खाली गेलेली आहे. मराठवाड्यातील शहरी भागात मोठी पाणीटंचाई आहे. जालना आणि उस्मानाबाद येथील नळांना महिन्यातून एकदाच पाणी येते. मराठवाड्यातील ५० नगरे तालुक्याच्या गावांना सध्याच महिन्यातून तीन-चार दिवस पाणी येते. पुढे हा पाणी प्रश्न अधिक तीव्र होणार आहे. यावर्षी मराठवाड्यात प्रचंड दुष्काळ असतानाही वरच्या भागातून जायकवाडीत मराठवाड्याच्या हक्काचे २५ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले नाही.

दुष्काळामुळे मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारी शेतीही धोक्यात आली आहे. मराठवाड्यात प्रचंड प्रमाणावर दुष्काळ आणि चाराटंचाई त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र असताना राज्य शासनाने एकप्रकारे दुष्काळग्रस्त जनतेबद्दल दुर्लक्षच व्यक्त केले आहे. गेल्या वर्षीच्या अपु-या पावसामुळे राज्यातील काही भागात आणि त्यातही मराठवाड्यात भीषण परिस्थ‌िती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात खरीप आणि रब्बीची पिके उद्‍ध्वस्त झाल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे.

कापूस , ज्वारी , सोयाबीन , मूग , तूर , सूर्यफूल , मका आदी पिके हातची गेली आहेत. फळबागा आणि ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील मोसं‌बी , डाळींब आणि अन्य फळपीक उत्पादक शेतक-यांपुढे कधी नव्हे एवढा प्रश्न उभा आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद त्याचप्रमाणे अन्य जिल्ह्यातील फळबागा उद्‍ध्वस्त होत आहेत.

मराठवाड्यात जनावरांच्या चा-याचा प्रश्न आहे. त्यामुळे शेतकरी जनावरे कवडीमोल भावाने विक्री करीत आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतक-याजवळ जनावरेच राहणार नाहीत आणि पुढच्या वर्षातील शेती व्यवस्थाही धोक्यात येणार आहे. जालना , उस्मानाबाद , औरंगाबाद , बीडसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांत कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र स्वरूपाचा आहे. पाळीव जनावरांशिवाय हरणे , माकडे त्याचप्रमाणे अन्य प्राणी , तसेच पक्ष्यांसमोरही पिण्याचा प्रश्न आहे. मराठवाड्यात रोजगाराचा मोठा प्रश्न या दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेला आहे.

Leave a Comment