विश्‍वरूपम’ला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली- अभिनेता-निर्माता कमल हसनच्या दक्षिणेत वादग्रस्त ठरलेल्या ‘विश्‍वरूपम’ हा चित्रपट आज उत्तर भारतातील चित्रपटगृहांमध्ये झळकला. या चित्रपटाबाबत निर्माण झालेल्या वादामुळे तो पाहण्याची उत्सुकता वाढल्याचा दावा मल्टिफ्लेक्स चालकांनी केला. उत्तर भारतातील चित्रपटगृहांमध्ये आज सुमारे 50 ते 60 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती होती. दरम्यान, तमिळनाडू वगळता आज विश्‍वरूपम देशभर प्रदर्शित झाला.

‘विश्‍वरूपम’वरून निर्माण झालेल्या वादामुळे त्याची येथे सकारात्मक प्रसिद्धी झाली. डीटी सिनेमामध्ये प्रेक्षकांची सुमारे 60 ते 70 टक्के उपस्थिती होती. आठवडाअखेर ती 100 टक्क्यांवर जाण्याची आम्हाला अपेक्षा असल्याचे डीटी सिनेमाचे प्रवक्ते अनंत वर्मा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात या चित्रपटाविरुद्ध आंदोलन झाले असले तरी दिल्लीसह पंजाब, हरियाणात तो सुरळीत प्रदर्शित झाल्यचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ‘विश्‍वरूपम ’प्रदर्शित झाला.

दरम्यान; ‘विश्‍वरूपम’ या वादग्रस्त चित्रपटाविरुद्ध ऑल इंडिया सुन्नी बोर्डाच्या कार्यकर्त्यांनी आज येथील चित्रपटगृहाबाहेर निदर्शने केली. या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळण्याची मागणीही त्यांनी केली. शुक्रवारची नमाज अदा केल्यावर आंदोलकांनी विश्‍वरूपमवर उत्तर प्रदेशात बंदी घालण्याच्या घोषणा दिल्या.

Leave a Comment