ममता बॅनर्जीमुळेच कोलकाता दौरा रद्द: रश्दी

कोलकाता – प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामुळेच आपला नियोजित कोलकाता दौरा रद्द करावा लागला, असा आरोप वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांनी आज केला. आपल्याला हद्दपार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितल्याचा दावा रश्दी यांनी केला. भारत सोडण्यापूर्वी जारी केलेल्या एकपानी निवेदनात त्यांनी हा आरोप केला आहे.

कोलकातामध्ये जाण्यापूर्वी एक दिवस आधी कोलकाता पोलिसांनी आम्हाला शहरात प्रवेश करण्याची परवानगी नाकारल्याचे समजले. जर मी कोलकाताला गेलोच तर मला पुढच्या विमानाने परत पाठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. हे सर्व मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विनंतीवरून झाल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

आपला कोलकाता दौरा पोलिसांनी अशक्य करून टाकला. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या कार्यक्रमाची माहिती प्रसारमाध्यमे आणि मुस्लीम नेत्यांना दिल्याचेही रश्दी यांनी ट्विट केले आहे.

कोलकाता लिट मीटमध्ये दीपा मेहता, राहुल बोस आणि रूचीर जोशी यांच्यासोबत अतिथी म्हणून सहभागी होण्याचे निमंत्रण आयोजकांनी दिले होते जर ते आता हे नाकारत असतील तर ते अप्रामाणिक आहेत. त्यांनी माझ्या विमानप्रवासाचे पैसेही दिले आहेत, असे रश्दी यांनी नमूद केले.

रश्दी यांच्या ‘मिडनाईटस चिल्ड्रन’ या कादंबरीवर दीपा मेहता यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 30 जानेवारीला हजर राहण्याचे निमंत्रण आयोजकांकडून त्यांना देण्यात आले होते. तथापि, आयोजकांनी या निमंत्रणाचा दावा फेटाळला आहे. हा चित्रपट आज भारतात प्रदर्शित झाला.

Leave a Comment