बेदींचा सुधारित लोकपाल विधेयकाला पाठिंबा

नवी दिल्ली – माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सुधारित लोकपाल विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या टीममधील महत्वाच्या सदस्यानेच त्यांच्यापेक्षा वेगळा सूर आळवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अण्णांनी या विधेयकाची खिल्ली उडवून पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने कालच सुधारित लोकपाल विधेयकाला मंजुरी दिली. मात्र, या विधेयकाबद्दल अण्णांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. याउलट, सुधारित विधेयकात आम्ही मांडलेल्या बहुतांश मुद्द्यांची दखल घेण्यात आली आहे, अशी प्रतिक्रीया देत बेदी यांनी त्याचे समर्थन केले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखाची नियुक्ती एका समितीमार्फत करण्याचा मार्ग सुधारित विधेयकाने मोकळा केल्याबद्दल बेदींनी समाधान व्यक्त केले आहे.

सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला लोकपालच्या देखरेखीखाली आणण्यात आले आहे. हेच आम्हाला हवे होते. आता लोकपालमध्ये सुधारणा करण्याचा पर्याय विरोधी पक्षांपुढे खुला आहे, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी मिळत आहे. आपण पुढचे पाऊल उचलत आहोत, अशा आशयाची प्रतिक्रीया त्यांनी सुधारित लोकपाल विधेयकाच्या घडामोडीसंदर्भात दिली आहे. मात्र, त्यांनी विधेयकाला पाठिंबा दर्शवून अण्णांशी विसंगत भूमिका घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment