बंगालच्या जंगलमहलमध्ये नक्षलवादी पुन्हा एकत्र

लालगढ – पश्‍चिम बंगालच्या जंगलमहल परिसरात वर्षभर शांत स्थिती होती. मात्र, आता या परिसरात पुन्हा माओवादी नक्षलवादी एकत्र येत असल्याची माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाला मिळाली आहे.

राज्याच्या पश्‍चिम मिदनापूर, बांकुरा आणि पुरूलिया या तीन जिल्ह्यांमधील काही भाग मिळून जंगलमहल परिसर बनला आहे. या परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये 2008 पासून जवळपास दररोज चकमकी झडायच्या. नक्षलवाद्यांकडून हत्येच्या घटना घडायच्या. मात्र, नोव्हेंबर 2011 मध्ये नक्षलवाद्यांचा म्होरक्या किशनजी चकमकीत मारला गेला. याशिवाय, इतर काही नक्षलवाद्यांना अटक झाली. त्यानंतर या परिसरात तुलनेने शांतता पसरली होती. या परिसरात 2010 आणि 2011 मध्ये तब्बल 350 हत्यांची नोंद झाली होती. मात्र, 2012 मध्ये हत्येची एकही घटना समोर आली नाही.

आता मात्र जंगलमहल परिसरात पुन्हा एकदा नक्षलवादी गोळा होऊ लागल्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे. हा परिसर जंगल आणि टेकड्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे नक्षलवादी आपले अड्डे बनवण्यासाठी या परिसराला प्राधान्य देतात. या परिसरात आता नक्षलवाद्यांचे छोटे गट एकत्र येऊ लागले आहेत. तसेच, नक्षलवादाकडे नव्या सदस्यांना ओढण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Leave a Comment