पाकिस्तानी अण्वस्त्र धोक्यातः शास्त्रज्ञांना भीती

लंडन – पाकिस्तानी लष्करात कट्टरवाद वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील अण्वस्त्रांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ही अण्वस्त्रे कट्टरवाद्यांच्या हातीही पडू शकतात, अशी भीती एका पाकिस्तानी शास्त्रज्ञानेच व्यक्त केली आहे.

अणुशास्त्रज्ञ आणि संरक्षणतज्ज्ञ असलेल्या परवेझ हुडभॉय यांनी संपूर्ण जगाला वाटणारी ही भीती अधोरेखित केली आहे. हुडभॉय यांनी लिहिलेल्या ‘कनफ्रंटिंग द बॉम्ब’ या पुस्तकाचे येथे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची सुरक्षा हा चिंतेचा मोठा विषय आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

पाकिस्तानकडे भारताइतकीच 120 ते 130 अण्वस्त्रे आहेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी अण्वस्त्रांकडे आत्मरक्षणाची सामग्री म्हणून पाहिले जात होते. मात्र, आता अण्वस्त्रस्पर्धा सुरू झाल्यामुळे अण्वस्त्रांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. भारत आणि पाकिस्तान हे देश आतापर्यंत पाच वेळा अणुयुद्धाच्या जवळ येऊन ठेपले होते. १९८७, १९९०, कारगील युद्धादरम्यान (१९९९), भारतीय संसदेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर (२००१) आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर २००८) अशी स्थिती निर्माण झाली होती, असा दावा त्यांनी केला. अणुयुद्ध झाल्यास संपूर्ण जगालाच त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.

अणुऊर्जा परवडणारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याबद्दल हुडभॉय यांनी साशंकता व्यक्त केली. अणुभट्टीची उभारणी खर्चिक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय, जपानमधील फुकुशिमा अणुसंकटासारखा एखादा अपघात झाल्यास भारत आणि पाकिस्तान हे देश उद्भवलेल्या परिस्थितीचा मुकाबला प्रभावीपणे करू शकतील का, याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली.

Leave a Comment