नंदींच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली – जयपूर येथील साहित्य मेळाव्यात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आलेले लेखक आणि समाजशास्त्रज्ञ आशिष नंदी यांच्या अटकेला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आज दिलासा दिला. तथापि, नंदी यांच्या अटकेला स्थगिती देण्यात आली असली तरी त्यांनी यापुढे अशी विधाने करू नयेत, असेही न्यायालयाने बजावले आहे.

नंदी यांनी आपल्याविरुद्धचा प्राथमिक माहिती अहवाल (एफआआर) रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने आपले म्हणणे मांडण्यासाठी केंद्र व राजस्थान सरकारला नोटीसही धाडली आहे.

जयपूर साहित्य मेळाव्यात केलेल्या विधानाबद्दल नंदी यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरसंदर्भात त्यांना अटक करण्यात येऊ नये, असे सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र, अशा प्रकारचे वक्तव्य पुन्हा करू नये, असे नंदी यांना सांगण्याची सूचनाही खंडपीठाने त्यांचे वकील अमन लेखी यांना केली.

सुनावणीदरम्यान, लेखी यांनी एकाच गुन्ह्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर नोंदवता येत नाही, असा युक्तिवाद केल्यावर नंदी यांच्या वक्तव्यामुळे सर्व ठिकाणच्या लोकांवर परिणाम झाला आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

दरम्यान, नंदी यांच्याविरुद्ध नाशिक, रायपूर आणि पाटणामध्ये एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे खंडपीठाने महाराष्ट्रासह छत्तीसगढ आणि बिहार सरकारलाही नोटीस धाडली आहे. या नोटिशीवर उत्तर देण्यास या राज्य सरकारांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

Leave a Comment