दाट धुक्यामुळे राजधानीत जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली – दाट धुक्यामुळे आज देशाची राजधानी दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले. धुक्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर मोठाच परिणाम झाला. तापमानाचा पारा खाली आल्यामुळे उत्तर भारतातही अनेक ठिकाणी जनजीवन प्रभावित झाले.

उत्तर भारतात मागील काही दिवस तापमान वाढल्यामुळे थंडीच्या लाटेपासून रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज अनेक भागांत पुन्हा एकदा थंडी परतली. त्यामुळे पसरलेल्या दाट धुक्याचा फटका दिल्लीला बसला. देशाच्या राजधानीत आज तापमानात फारसा बदल झाला नसला तरी धुक्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूक प्रभावित झाली. दाट धुक्यामुळे 50 मीटरच्या अंतरावरचेही दिसत नव्हते.

सकाळी येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतूक सुमारे पाच तास ठप्प झाली. सुमारे 130 विमान उड्डाणांना विलंब झाला, तर 19 उड्डाणे रद्द करण्यात आली. धुक्यामुळे उत्तर भारतातील 30 रेल्वेगाड्यांच्या सेवेवर परिणाम झाला. दिल्लीत 10 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या.

दरम्यान, काश्मीर खोर्‍यात दोन दिवसांच्या खंडानंतर पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. काश्मीरसह काही भागांत येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस आणि जोरदार बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment