डिझेल दर महिन्याला ५० पैशांनी महागणार

नवी दिल्ली – देशातील सर्वाधिक वापराचे इंधन असलेल्या डिझेलच्या विक्रीतून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे दर महिन्याला डिझेल प्रतिलिटर 40 ते 50 पैशांनी महागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एम.वीरप्पा मोईली यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना याबाबतची केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. पुढील आदेशापर्यंत इंधन विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याला डिझेलच्या दरात लिटरमागे 40 ते 50 पैशांची वाढ करू शकतात, असे ते यावेळी म्हणाले. अर्थात, पुढील दरवाढ केव्हा होईल, हे सांगण्याचे मोईली यांनी टाळले.

डिझेलचे दर नियंत्रणमुक्त करण्याच्या दिशेने पाऊल टाकणारा एक निर्णय सरकारने 17 जानेवारीला घेतला. त्यानुसार दर महिन्याला डिझेलच्या दरात अल्प वाढ करण्याचा अधिकार सार्वजनिक इंधन कंपन्यांना देण्यात आला. हा निर्णय घेण्यात आल्याच्या दिवशीच इंधन कंपन्यांनी डिझेलच्या दरात 45 पैशांची वाढ केली.

स्थानिक कर समाविष्ट केल्यामुळे या दरवाढीत सर्वत्र थोडाफार फरक होतो. बाजारमूल्यापेक्षा कमी दरात सध्या डिझेल विक्री केली जाते. त्यामुळे सार्वजनिक इंधन कंपन्यांना लिटरमागे सुमारे 11 रूपयांचे नुकसान सोसावे लागते. हे नुकसान भरून निघेपर्यंत प्रत्येक महिन्याला अल्प दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठ्या खरेदीदारांसाठी (बल्क कंझ्युमर्स) डिझेलच्या दरात लिटरमागे सुमारे 10 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे काही राज्यांनी आपल्या परिवहन महांमडळांच्या बसगाड्यांमध्ये पंपांवर डिझेल भरण्याचा आदेश दिल्याचे वृत्त आहे. यापार्श्‍वभूमीवर, असा आदेश देण्याऐवजी राज्यांनी डिझेलवरील कर कमी करून दर खाली आणावा, असा सल्ला केंद्रीय पेट्रोलियम मंत्री एम.वीरप्पा मोईली यांनी दिला आहे.

Leave a Comment