अनेमिक मुली अत्याचाराचा सामना कसा करणार? -डॉ. अनुरेखा देशमुख

पुणे – महिलांवर बलात्कार करणार्यामला फाशी द्यायचे की अजूनही त्यावर जरब बसेल असा मार्ग अनुसरायचा यावर कदाचित मार्ग निघेल पण महिलेची किमान प्रतिकाराची पात्रता आहे का किंवा ती मानसिक दुर्बलतेने ग्रस्त आहे यावर मात्र समाजाचे दुर्लक्ष झाले आहे कारण शंभरपैकी ८५ मुलींचा अनेमिया म्हणजे रक्तक्षय आहे. त्यामुळे त्यांची प्रतिकाराची मानसिकता सोडा पण त्याना कायम थकल्यासारखे वाटत असते. विस्मरण, चिडचिड, अभ्यासाची इच्छा न होणे, शाळेला बुट्टी मारणे यांच्या बळी असतात. त्यांची हृदयाची क्षमता कमीच असल्याने त्या प्रतिकार करायला असमर्थ असतात आणि किरकोळ आजारीपणाने त्यांची हॉस्पिटलमधील आय सी यु मध्ये दाखल करण्याची स्थिती येते. या विरोधात फक्त महिलांनीच नव्हे तर सर्व समाजाने लक्ष देणे आवश्यक आहे, असे पुण्यातील पाच हजार मुलींचा पाच वर्षे अभ्यास करून इंडियन मेडिकल असोसिएशनला पेपर सादर केलेल्या पुण्यातील डॉक्टर अनुरेखा देशमुख यांचे मत आहे. त्या बद्दल त्यांचा थोर व्यासंगी डॉक्टर ह.वि. सरदेसाई याच्या हस्ते सन्मानही झाला आहे.

सध्या महिलावर होणारे अत्याचार, महिलांचे सबलीकरण व महिलांची संख्या एक हजाराला आठशेपेक्षाही कमी होणे अशा समस्या भेडसावत आहेत. या समस्यांचा सामना करणे ही फार दूरची बात आहे. त्यांच्या अंगातील हिमोग्लोबीनचे प्रमाण इतके कमी असते की, त्या शाळेच्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्या तरी कानावर पडलेला शब्द आत घेण्याची त्यांची स्थिती असतेच असे नाही. ही बाब केवळ गरिबीतील मुलीचीच असते असे नाही तर श्रीमंतीत वाढलेल्या मुलींनाही इंस्टंट फूडमधून सत्वहीन उष्मांक मिळतात. त्यातून जिभेचे चोजले होतात पण रक्तक्षय मात्र तसाच राहतो.

डॉ देशमुख यांनी कर्वे शिक्षणसंस्थेतील व आजूबाजूच्या परिसरातील पाच हजार मुलींचे रेकॉर्ड तयार करून उपचार केले आहेत. त्यांच्यावर औषधापेक्षाही हिरव्या भाज्या, फळे आणि आहारात त्यांना परवडेल असे बदल करून विस्मयजनक फरक करून दाखविले आहेत. या संदर्भात डॉ देशमुख म्हणाल्या, सध्याचा काळच महिलांच्या प्रश्नाच्या जागृतीचा आहे. अनेक संस्था व संघटना पुढे आल्या आहेत. महिलांना धैर्य दाखवावे, स्वसंरक्षणात्म काही साधने बरोबर ठेवावीत असे मुद्दे मांडले जात आहेत त्या सार्यामत तथ्य आहे पण महिलांची मूळ स्थिती कशी आहे यावर लक्ष जाताना दिसत नाही.
मी कर्वे इंस्टिट्यूटमधील मुलींच्या प्रकृतीच्या अभ्यासाने बोलत आहे तेथे तर अडचणीतील मुली असतात म्हणून तेथीलच परिस्थिती दयनीय असेल असे वाटाण्याची शक्यता आहे पण मी जी आकडेवारी दिली आहे ती सर्वसाधारण समाजातील आहे. खेड्यातील मुली, झोपडपट्टीतील मुली, फ्लॅटमधील मुली आणि बंगल्यातील मुली यांचीही हीच स्थिती आहे . पुणे विद्यापीठाने याबाबत केलेल्या पाहणीचाही हाच निष्कर्ष आहे येवढेच नव्हे तर जागतिक आहार संघटनेचाही असाच निर्वाळा आहे.

असे जरी असले तरी प्रत्यक्ष मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीन वाढावे म्हणून जे प्रयत्न होतात ते फार कमी असतात. त्यातील बरेचसे प्रयत्न हे औधषातून असतात पण ते जर आहारातून झाले तर तो खरा उपयोगी ठरतो. यातील उपचाराचा जेवढा मुद्दा महत्वाचा आहे तेवढाच तो मुद्दा आपल्या दृष्टीकोनाचा आहे. मुलींच्या तुलनेत मुलांची स्थिती काहीशी निराळी असते त्याच्यातही हिमोग्लोबीन कमीची समस्या असते पण जात्या मुले ही मोकळ्या हवेवर खेळण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे त्यांना तेवढ्याच आहारात बरे हिमोग्लोबीन मिळत असते तरीही त्यांची आहाराबाबतची गरज त्यातून भागते असे मात्र नव्हे.

मुलींच्या समोर अजून अनेक समस्या व आव्हाने असतात व पंधरा वर्षापर्यंतच्या वयात त्याकडे लक्ष दिले गेले नाही तर त्यांचा अभ्यास, त्यांचे मातृत्व आणि त्यांचे पूर्ण जीवन हे असेच रक्तक्षयाने ग्रासलेले जाते असे सांगताना त्या म्हणाल्या, त्यासाठी पालेभाज्या, फळे आणि समतोल आहार आवश्यक असतो. वास्तविक त्या सार्या, बाबी तर प्रत्येक घरात असतात तरीही मुलीच्या वाटेला त्या पुरेशा प्रमाणात जातात का हे जर परिणामाच्या अंगाने बघितले तर उत्तर नकारात्मक मिळते. आपल्याकडे मुलींना आवश्यक असणारे बारा हिमोग्लोबीन हे नसते. सात, आठ, नऊ याच्या पुढे ते नसते.

आगामी काळात मुलींना स्पर्धात्म परीक्षांना बसायचे आहे, त्याना एक दोन मुलांना जन्म देऊन शिवाय दिवसभराचे नोकरीचे काम करायचे आहे. धकाधकीच्या जीवनात तिला टिकायचे आहे आणि आता त्यातही दिल्लीच्या ‘निर्भया’वर जी वेळ आली ती टाळण्यासाठी लढ्याच्या पवित्र्यातही राहायचे आहे. ही येवढी शक्ती, मनोबल आणि एकाग्रता हे सारे करायचे असेल तर प्रथम तिच्या प्रकृतीकडे लक्ष देणारी यंत्रणा अधिक प्रभावी हवी, असेही डॉ अनुरेखा देशमुख यांनी सांगितले

Leave a Comment