अनामिकेचे कुटुंबिय सोनियांना भेटणार

नवी दिल्ली दि.२ – दिल्लीतील १६ डिसेंबरच्या भीषण सामुहिक बलात्कार प्रकरणात बळी पडलेल्या मुलीच्या पालकांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी वेळ मागितली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मुलीचे वडील या संदर्भात बोलताना म्हणाले की आम्ही सोनियांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि ती मिळताच त्यांना भेटून आम्ही या प्रकरणात ज्या गुन्हेगाराला अल्पवयीन ठरविल्यामुळे अगदी मामुली शिक्षा होण्याची शक्यता आहे, त्याविरोधात अपवाद करून  या गुन्हेगाराला वय नाही तर गुन्हा पाहून फाशीच दिली जावी अशी मागणी करणार आहोत.

या बलात्कार प्रकरणात पाच आरोपींविरूद्द आज न्यायालयात आरोप ठेवण्यात येणार असतानाच सहाव्या आरोपीला मात्र त्यानेच मुलीवर सर्वाधिक अत्याचार केले असतानाही बालगुन्हेगार म्हणून घोषित केले गेले आहे. त्यामुळे त्याला मोठा अपराध असतानाही किरकोळ शिक्षा होण्याची शक्यता आहे. याचा आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे असेही मुलीचे वडील म्हणाले. त्याविरोधात आम्ही सोनियाजींना भेटून या संदर्भातले नियम शिथिल करून या अल्पवयीन मुलाला कडक शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात बदल करावा अशीही मागणी करणार आहोत. इतका अक्षम्य अपराध केलेला आरोपी अल्पवयीन म्हणून किरकोळ शिक्षेवर सुटावा हे बरोबर नाही असेही ते म्हणाले. न्यायालयातही ते या विरोधात अपील दाखल करणार आहेत.

मुलीचा भाऊ म्हणाला की माझ्या बहिणीवर झालेल्या क्रूर बलात्काराचा निषेध करण्यासाठी ज्याप्रमाणे सारा देश एकदिलाने उभा राहिला, त्याचप्रमाणे आता या अल्पवयीन गुन्हेगाराला फाशीच दिली जावी यासांठीही देशव्यापी आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकार कायद्यात बदल करू शकते व तसा बदल पुढील दृष्टीनेही योग्य होणारा असल्याने असा बदल व्हावा म्हणूनही जनआंदोलन करणे गरजेचे बनले आहे.

Leave a Comment