युडीआरएसविरुद्ध बीसीसीआयने थोपटले दंड

आगामी काळात कोणताही यजमान संघ टीम इंडियाविरुद्ध यूडीआरएसची मागणी करीत असेल तर टीम इंडिया त्या देशाचा दौरा रद्द करेल, असा इशारा बीसीसीआयने देत ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयने युडीआरएसविरुद्ध दंड थोपटले असल्याचे सिद्ध होत आहे.

नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे प्रतिनिधी जाइल्स क्लार्क यांनी युडीआरएसच्या नियमांमध्ये बदल करण्याचा मुद्दा मांडला होता. परंतु बीसीसीआयने या प्रस्तावाला विरोध केला. बीसीसीआयच्या विरोधानंतर एकाही मंडळाने या पद्धतीला पाठिंबा दर्शविला ना विरोध केला. त्यामुळे युडीआरएसला विरोध कुणाचा हे स्पष्ट होऊ शकले नाही. सध्याच्या परिस्थितीनूसार युडीआरएससाठी यजमान संघ आणि पाहुणा संघाच्या क्रिकेट मंडळांची सहमती आवश्यक असते. मात्र क्लार्क यांनी यात बदल करताना हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त यजमान संघाकडे दिला जावा असा प्रस्ताव ठेवला होता.

बीसीसीआयच्या मते युडीआरएसच्या तंत्रात अद्यापही दोष आहेत. टीम इंडियाचे काही खेळाडू युडीआरएसच्या बाजूने आहेत. असे असले तरी बीसीसीआयने युडीआरएस लागू करणार्‍या मंडळाला सरळ शब्दांत आपला विरोध दर्शवित इंडियाचा संघ खेळावे असे वाटत असेल तर युडीआरएसशिवाय मैदानात उतरावे असा इशारा दिला आहे.

Leave a Comment