सिरीया शरणार्थींना भारताची २५ लाख डॉलर्सची मदत

कुवेत दि.३१ – सिरीयातील संघर्षामुळे विस्थापित झालेल्या २० लाखांहून अधिक नागरिकांना भारत सरकारतर्फे २५ लाख डॉलर्सची मदत देण्यात येत असल्याचे परराष्ट्र राज्यमंत्री ई अहमद यांनी सांगितले. सिरीयावर झालेल्या आंतरराष्ट्रीय दान दात्यांच्या संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांच्या हस्ते झाले.

सिरीयातील संघर्ष ग्रस्त नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करणे या उद्देशाने भरविले गेलेले हे संमेलन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने घालून दिलेले चांगले उदाहरण आहे असे सांगून अहमद म्हणाले की भारत सरकार जी मदत देणार आहे ती जीवनरक्षक औषधे, अन्न धान्य, रोजच्या गरजेच्या वस्तू स्वरूपात असेल. सिरीयातील संघर्षात विदेशी सैन्याचा जो हस्तक्षेप होत आहे त्याबद्दलही भारताने नाराजी नोंदविली असल्याचे अहमद यांनी सांगितले.

सिरीयातील बशर अल असद यांचे सरकार आणि अमेरिकेचे समर्थक असलेले विरोधी गट यांच्यात गेली दोन वर्षे सतत संघर्ष सुरू असून त्यात आत्तापर्यंत ६० हजार नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे.

Leave a Comment