लोकपाल विधेयक सुधारणा अमान्य: अण्णांचा संघर्षाचा इशारा

पाटणा: एकीकडे लोकपाल विधेयकातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली; तर दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विधेयकातील सुधारणा आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जनलोकपालच्या मागणीसाठी आपला लढा सुरूच राहील; असा इशाराही अण्णांनी दिला आहे.

आगामी संसद अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न राहील; अशी ग्वाही देणारे पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काही दिवसापूर्वी अण्णांना पाठविले होते. मात्र अशी अनेक पत्र मला यापूर्वी आली आहेत; मात्र सरकार खोटारडे असल्याने आपला त्यांच्यावर विश्वास नसल्याची टीका अण्णांनी केली.या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकातील प्रस्तावित सुधारणांना मान्यता देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक सुरू असतानांच अण्णांनी या सुधारणांविरोधात आक्रमक भूमिका जाहीर केली.

सरकारचे सुधारित लोकपाल विधेयक निरुपयोगी असून त्यामुळे जनतेला काहीही दिलासा मिळणार नाही. कडक जनलोकपाल विधेयकासाठी आमचा लढा सुरूंच राहील; असा इशारा अण्णांनी पाटणा येथे दिला. देशभर दौरे करून आपण जनलोकपाल कायद्याबाबत जागृती करणार असून काही महिन्यातच आंदोलनाला वेग येईल; असे अण्णांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे दावेदार; गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातला भ्रष्टाचारमुक्त करण्याबाबत फारसे गंभीर नसल्याची टीका अण्णांनी यावेळी बोलताना केली. गुजरातमध्ये लोकायुक्त नियुक्त करून मोदी यांनी राज्यातील भ्रष्टाचार का निपटून काढला नाही; असा सवाल करून अण्णा म्हणाले की; उद्या मोदी देशाचे पंतप्रधान झाले; तर ते देशातील भ्रष्टाराबाबत किती संवेदनशील असतील; हेच यावरून दिसून येते.

मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधल्या भ्रष्टाचाराबाबत बोलणे त्यांनी टाळले.

Leave a Comment