पुढच्या गुजराथ गुंतवणूक समिटमध्ये इस्त्रायलचाही सहभाग

अहमदाबाद दि. ३१ – व्हायब्रंट गुजराथ ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट २०१५ मध्ये इस्त्रायल गुजराथचा पार्टनर म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे असे इस्त्रायलचे भारतातील राजदूत अॅलन उझपिझ यांनी सांगितले. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण गुप्त बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अॅलन म्हणाले की गुजराथ आम्हाला आमच्या घरासारखेच आहे. आंबा पिकासाठी इस्त्रायली तंत्रज्ञानानाचा वापर गुजराथने यशस्वी करून दाखविला असून आता यानंतर भाजीपाला उत्पादनासाठीही आम्ही तंत्रज्ञान पुरविणार आहोत. त्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सही सुरू करण्यात येत आहे. त्याचबरोबर सांडपाण्याचे रिसायकलिंग करून त्याचा वापर कृषी क्षेत्रासाठी केला जाणार आहे. इस्त्रायल हा जगातील एकमेव देश आहे जेथे ८० टक्के सांडपाणी प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर केला जातो. जलव्यवस्थापन, अपारंपारिक उर्जा तसेच औष्णिक उर्जा या क्षेत्रातही इस्त्रायल गुजराथला सहकार्य करणार आहे.

गुजराथेतील एका शहरातील कपडे दुकानाला हिैटलर असे नांव दिल्याप्रकरणी झालेल्या वादाबद्दल बोलताना अॅलन म्हणाले की मी अशा कुटुंबातून आलो आहे, ज्यातील अनेक सदस्य दुसर्यात महायुद्दात ज्यू असल्यामुळे मारले गेले आहेत. दुकानाला हिटलर असे नांव दिल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या होत्या मात्र त्याबाबत लगोलग निर्णय घेऊन कारवाई करण्यात आली आणि दुकानाने नांव बदलले गेले याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे.

Leave a Comment