राज ठाकरे यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंटला स्थगिती

नवी दिल्ली- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या अजामीनपात्र वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

सन 2008 साली बिहारींच्या विरोधात केलेल्या जाहीर आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात त्यांच्या विरोधात बिहारच्या मुज्जफरपुर येथील न्यायालयात दोन खासगी व्यक्तींनी खटले दाखल केले आहेत. त्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने या न्यायालयाने त्यांच्या विरोधात हे वॉरंट जारी केले होते.

बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्यावेळी राज ठाकरे यांच्यावतीने बाजू मांडताना त्यांचे वकिल मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, एका वकिलाच्या अर्जावर हा खटला दाखल करून त्यानुसार वॉरंट बजावण्यात आले आहे. त्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा किंवा सबळ पार्श्‍वभूमी देण्यात आलेली नाही.

देशातील कोणत्याही विषयावर कोणालाही मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे.
अशी वक्तव्ये खरोखरच प्रक्षोभक आहेत की नाहीत हे तपासूनच त्या अनुषंगाने कारवाई करणे उचित राहील; असे अ‍ॅड. रोहतगी म्हणाले.

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यांच्या विरोधात देशभरातील विविध न्यायालयांमध्ये एकूण 16 तक्रारी किंवा खटले दाखल करण्यात आले असून त्याची एकत्रित सुनावणी दिल्लीच्या हायकोर्टात सुरू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे.

Leave a Comment