बाहेरच्यांनी सल्ले देऊ नयेत: शाहरुख खान

मुंबई: शाहरुख खान याच्या सोशल मिडीयावरील उल्लेखाने वाद पेटला असताना शाहरुखने मंगळवारी आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देतानाच पाकीस्तानाला; ‘बाहेरच्यांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही;’ अशा शब्दात फटकारले आहे.

आपल्या मुस्लिम असल्याने काही वेळा आपल्यावर अन्याय झाल्याचे विधान शाहरुखने केले होते. मात्र आपण आपल्यावर उदंड प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा अवमान होईल; असे विधान केलेले नाही. आपल्या म्हणण्याचा अर्थ हा होता की; काही वेळा एखाद्या कलाकाराच्या जाती, धर्मावरून त्याच्या विधानांचा विपर्यास केला जातो. भारतात मला एक कलाकार म्हणून मला उदंड प्रेम आणि सन्मान मिळाला आहे. याबद्दल मी या देशाचा ऋणी आहे. माझ्या भावना लक्षात न घेता माझ्या विधानाचा अपप्रचार करणार्या लोकांनी माझे विधान लक्षातच घेतलेले नाही; अशी टीका शाहरुखने केली.

आपण कोणत्याही धर्माचे असलो तरीही त्याआधी आपण भारतीय आहोत; अशी माझी धारणा आहे आणि हेच संस्कार मी माझ्या मुलांवर केले आहेत. मात्र अनेकदा मला अकारण वादात ओढण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र विघ्नसंतुष्ट लोकांचे दुष्ट हेतू सध्या झाले नाहीत. मी खान आहे. मात्र हा माझ्या पुराणमतवादी असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. मला भारतातील आणि जगभरातील चाहत्यांकडून जे प्रेम मिळाले आहे; त्याच्या जोरावर मी कितीही मोठ्या संकटाला सामोरे जायला तयार आहे; असेही शाहरुखने नमूद केले.

यापूर्वी; भारताने अभिनेता शाहरूख खान याला पुरेशी सुरक्षा पुरवावी अशी मागणी पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी केली आहे. त्यावर भारताने जोरदार प्रतिक्रीया दिली असून पाकिस्तानने शाहरूखची चिंता करू नये. देशातील नागरीकांची सुरक्षा करण्यास भारत सक्षम आहे, त्याऐवजी रहमान मलिक यांनी त्यांच्या देशातील नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी अशी सूचना भारताचे गृहसचिव आर के सिंग यांनी केली आहे.

स्वत: शाहरूख खान याने आपण मुस्लिम असल्याने आपला काही जण किती द्वेष करतात असा एक सूर आपल्या एका ब्लॉग लिखाणात काढला होता. त्याला भारतात असुरिक्षत वाटत असेल तर त्याने पाकिस्तानात यावे अशी जाहीर सूचना एका दहशतवादी नेत्यांने केली होती त्यानंतर हे शब्द युद्ध सुरू झाले आहे. शाहरूखला वाटणार्‍या सुरक्षेच्या काळजीबद्दल प्रतिक्रीया देताना पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक म्हणाले की; शाहरूख हा जन्माने भारतीय नागरीक आहे. आणि तो भारतीयच राहणार आहे. परंतु त्याला जी सुरक्षेची काळजी वाटत आहे त्या पार्श्‍वभूमीवर भारत सरकारने त्याला पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी विनंती मी भारत सरकारला करीत आहे. तो एक स्टार आहे आणि त्याच्यावर भारताप्रमाणेच पाकिस्तानचे नागरीकही प्रेम करतात. त्यामुळे त्याला पुरेशी सुरक्षा दिली जावी अशी अपेक्षा रहमान मलिक यांनी व्यक्त केली आहे.

त्यांना प्रत्युत्तर देताना भारताचे गृहसचिव आर के सिंह म्हणाले की त्यांनी भारतातील नागरीकांच्या सुरक्षेची काळजी करण्यापेक्षा पाकिस्तानातील नागरीकंाच्या सुरक्षेची काळजी करावी.आम्ही आमच्या लोकांची काळजी घेण्यास सक्षम आहोत.