पाकमध्ये देशद्रोही आणि लोकशाहीविरोधकांची अभद्र युती: अश्रफ

इस्लामाबाद – देशातील लोकशाही प्रक्रियेला विरोधांकडूनंच घातपात घडवला जात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांनी केला आहे. ते म्हणाले की लोकशाहीविरोधी घटक आणि देशविरोधी घटकांनी आपसात हात मिळवणी करून देशाच्या स्थैर्याला आव्हान देण्याचे काम सुरू केले आहे.

आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना त्यांनी देशापुढील अस्थिरतेच्या स्थिती विषयी विश्‍लेषण करून काही सूचना संबंधितांना केल्या. पाकिस्तानात कॅनडाहून आलेले ताहीर उल कादरी यांनी आव्हान निर्माण केले आहे. त्यांनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची सूचना सरकारला केली होती. ती सरकारने फेटाळून लावली आहे. असे करणे घटना विरोधी होईल असे अश्रफ यावेळी सांगितले.

अश्रफ या बैठकीत म्हणाले की; देशात लोकशाही मूल्ये रूजवण्यासाठी आपले सरकार कसोशीचे प्रयत्न करीत असताना लोकशाहीविरोधी शक्तींनी देशात उच्छाद मांडून देशाची अर्थिक प्रगतीही रोखली आहे. हा अत्यंत धोकादायक प्रकार असून या घटकांना धडा शिकवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या संबंधात आपले सरकार कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही असे ते म्हणाले.

Leave a Comment