अण्णांचे पुन्हा हरीओम

पाटणा दि.३० – ज्येष्ठ समाजसेवक व भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अण्णा हजारे यांनी आजपासून जनतंत्र रॅलीची सुरवात केली असून दुपारी बारा वाजता पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर त्याचे उद्घाटन झाले. अण्णांचे भाषण ऐकण्यासाठी दाट धुके आणि कडक थंडीची पर्वा न करता हजारेा कार्यकर्ते या मैदानात सकाळपासूनच जमले आहेत. मैदानावर होत असलेली गर्दी लक्षात घेऊन कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे तसेच सीसीटिव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत.

माजी लष्करप्रमुख जनरल व्हि.के सिग यांनी यावेळी सांगितले की जमलेल्या समर्थकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्ताने पावन झालेल्या मातीच्या कलशासमोर भ्रष्टाचाराविरोधात लढाई सुरू ठेवण्याची शपथ दिली जाणार आहे. गांधीची हत्या जेथे झाली, जेथे महात्माजींचे रक्त मातीत पडले ती ही माती इंग्लंडमध्ये नेऊन तिचा लिलाव करण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेवी निर्मलेंदू गांधी या मातीचा कलश घेऊन कालच पाटण्यात हजर झाले आहेत.

पाटण्याचे प्रमुख पोलिस अधिकारी जयकांत यांनी सभेच्या ठिकाणी ५०० पोलिस, जलद कृती दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याचे सांगिगले आहे. तसेच इंडिया अगेन्स्ट करप्शनतर्फे – मी अण्णा – असे लिहिलेल्या १ लाख गांधी टोप्या येथे वाटण्यात येत असून या टोप्या महिला बचत गटाकडून तयार करून घेण्यात आल्या आहेत. या टोप्यांसाठी आलेला खर्च निघावा म्हणून शक्य असेल त्यांनी १० रू देऊन टोपी विकत घ्यायची आहे मात्र ज्यांना हे पैसे देणेही शक्य नाही त्यांना टोप्या मोफत देण्यात येणार आहेत असे इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य सुदामसिंग यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्याशी फारकत घेतल्यानंतर अण्णांची ही पहिलीच मोठी रॅली आहे.

Leave a Comment