संघीय विचारवंतांचा भाजपला घराचा आहेर

नागपूर: नितीन गडकरींना पक्षाध्यक्ष पदाची दुसरी टर्म मिळू नये; यासाठी पक्षातील काही जणांनी सरकारशी हातमिळवणी करून गडकरींच्या विरोधात कट रचला आणि प्रत्यक्षात उतरवला; असा आरोप करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत समजले जाणारे मा. गो. वैद्य यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे. मात्र हे आपले वैयक्तिक मत असून त्याच्याशी संघाचा संबंध नाही; असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.

आपल्या ब्लॉग लेखात वैद्य यांनी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी, त्यांचे पुत्र आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महेश जेठमलानी, खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा या चौघांचा स्पष्ट नामोल्लेख करून गडकरींच्या विरोधात पक्षांतर्गत कारस्थान शिजल्याचा आरोप केला आहे.
गडकरी यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आणि विस्तार पावलेल्या पूर्ती उद्योग समूहाचे व्यवहार संशयास्पद असल्याची चर्चा ३ महिन्यापूर्वीच सुरू झाली. सरकारनेही या व्यवहारांची चौकशी करण्याची ग्वाही दिली. मात्र चौकशीच काय; साधी नोटीसही आलेली नसताना गडकरी हटवच्य मागण्या जेठमलानी आणि सिन्हा यांनी लाऊन धरायला सुरुवात केली.

पुढेही अडीच तीन महिन्यात काही घडले नाही आणि पक्षाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस बाकी असताना आयकर विभागाने पूर्ती समूहाच्या कार्यालयावर धाडी घातल्या; हा निश्चितपणे योगायोग नाही; असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

या सर्व घटनाक्रमावरून गडकरी यांच्या पक्षातील विरोधकांनी कट रचला आणि हे कारस्थान करणारे ‘भाजपाई’ आणि सरकार यांच्यात साटेलोटे आहेत; अशी शंका घेण्यास वाव आहे; असे वैद्य यांनी ब्लॉग लेखात नमूद केले आहे.

Leave a Comment