सोने आयातदारांनी आयात थांबविली

मुंबई दि. २९ – जगातील सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश अशी भारताची आंतररराष्ट्रीय ओळख निर्माण झाली असतानाच सोने आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर सोने आयातदारांनी त्यांची आयात थांबविली असून शिल्लक स्टॉक प्रथम विकण्यास पसंती दिली आहे असे समजते. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण होऊनही ट्रेडर्सनी सोने बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीला आणले होते.

सोने आयात दरात वाढ होणार असल्याचे संकेत अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी दिल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यातच सोने आयातदारांनी मोठ्या प्रमाणावर सोने आयात केले होते. त्यानंतर मात्र खरेदी जवळपास थांबविलीच गेली आहे. सोने आयातीचा दर चार टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. मात्र पूर्वी आयात केलेले सोने विकले जाईपर्यंत नवीन आयात न करण्याचे आयातदारांनी ठरविले आहे. या आठवड्यात हा जुना स्टॉक संपेल असे डीलरचे म्हणणे आहे.

सोने आयात करताना रूपयाचा विनिमय दरही महत्त्वाचा ठरत असतो कारण सोने डॉलर्समध्ये खरेदी केले जाते. रूपयाचा दर घसरलेला असेल तर जादा पैसा मोजावा लागतो असेही या डिलरचे म्हणणे आहे. आंतररराष्ट्रीय बाजारात सोन्याची फेब्रुवारीसाठीची डिलिव्हरी सुरू झाली असल्याचेही समजते.

Leave a Comment