
श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या निवड समिती प्रमुखपदी माजी कर्णधार आणि खासदार सनथ जयसुर्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जयसुर्याच्या अध्यक्षतेखाली नव्या निवड समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने नुकतीच ही घोषणा केली.
गेल्या काही दिवसापासून श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या निवड समिती प्रमुखपदी कोणाची वर्णी लागणार या वरून उत्सुकता लागली होती. आगामी विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता या निवड समितीवर कोणाची निवड केली जाते याला महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसापासून श्रीलंका संघात मोठे फेरबदल केले जात आहेत. नवीन निवड समितीची नियुक्ति हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.
या समितीत हेमंत विक्रमारत्ने, प्रमोदया विक्रमसिंघे, चमिंडा मेंडिस आणि एरिक उपशांता यांचा समावेश आहे. या पूर्वीच्या समितीतील विक्रमसिंघे यांचाच नव्या निवड समितीत समावेश करण्यात आला आहे. विक्रमसिंघे आणि जयसुर्या दोघेही १९९६ च्या विश्वचषक जिंकणा-या संघातील सदस्य आहेत.