भारताच्या आण्विक क्षमतेत वाढ

नवी दिल्ली:रविवारी भारताने घेतलेल्या पाण्याखालून मारा करू शकणार्‍या के-५ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारताची आण्विक संहारक क्षमता वाढल्याचे मानले जाते. आजवर जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत अशा पद्धतीने मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित करणार्‍या भारताने सामरिक संशोधन आणि सज्जतेमध्ये एक मोठे पाऊल टाकले आहे. एक नजर भारताच्या आण्विक संहारक क्षमतेवर…

अग्नी क्षेपणास्त्र मालिका- सर्वांत प्रथम भारताने आण्विक क्षेपणास्त्रांची सुरुवात अग्नी या रणगाडाभेदी (बॅलेस्टिक मिसाईल) क्षेपणास्त्रापासून केली. अग्नी-१ लघुक्षमतेचे म्हणजे ७०० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र होते तर अग्नी-2 मध्यम पल्ल्याचे (२०००ते ३००० किमी), अग्नी-३ (३५०० ते ५००० किमी), अग्नी-४ (३००० ते ४००० किमी), अग्नी-५ आंतरखंडीय (५००० ते ५८०० किमी) आणि आता विकसित होत असलेले अग्नी-६ हेही आंतरखंडीय रणगाडाभेदी क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला ८००० ते १०००० किमी असणार आहे.

निर्भय-ब्राह्मोस क्षेपणास्त्र मालिका- ध्वनीच्या वेगाने जाणार्‍या म्हणजे सुपरसॉनिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेपणास्त्र मालिकेत भारताने आजवर निर्भय आणि ब्राह्मोस-१, ब्राह्मोस-२ या क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे. निर्भयचा पल्ला १ हजार किमी असून ब्राह्मोसचा पल्ला २९० किमी आहे. ही क्षेपणास्त्रे युद्धनौकेवरून डागता येतात. यापैकी ब्राह्मोस-१ नाविक दलात समाविष्ट आहे. ब्राह्मोस-२ हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र असेल. यामुळे नाविक दलाची क्षमताही वाढली आहे.

पृथ्वी क्षेपणास्त्र मालिका- जवळच्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याच्या दृष्टीने भारताने पृथ्वी क्षेपणास्त्र मालिकेची निर्मिती केली. पृथ्वी-१, पृथ्वी-२ पृथ्वी-३ चा पल्ला अनुक्रमे १५० किमी, २५० किमी आणि ३५० किमी आहे. ही तीनही क्षेपणास्त्रे भारतीय लष्करात दाखल आहेत. त्याआधी तयार केलेले पोपेये जातीचे, ७८ किमी पल्ला असलेले क्षेपणास्त्रही कार्यरत आहे.

सागरिका क्षेपणास्त्र मालिका- पाणबुडीवरून किंवा सागरी युद्धनौकेवरून डागता येतील या मालिकेतील क्षेपणास्त्रेही भारताकडे आता उपलब्ध आहेत. त्यापैकी के-१५ -सागरिका या क्षेपणास्त्राची क्षमता ७०० ते २ हजार २०० किमी आहे. मध्यम पल्ल्याच्या के-४- १ चा पल्ला ३ हजार ५०० किमी असून के-४- २ चा पल्ला ५ हजार किमी आहे. के -5 क्षेपणास्त्र हे विकसित करण्यात येत असून त्याचा पल्ला ६ हजार किमी असेल. के मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रे पाण्याखालील पाणबुडीवरूनही डागता येतात. याशिवाय शौर्य नामक टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाईलही लष्कराच्या सेवेत दाखल आहे.