रेपो दरांमध्ये कपात, गृहकर्ज धारकांना दिलासा

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेने सोमवारी तिमाही पतधोरण जाहीर केले. या धोरणात आरबीआयने सर्वसामान्य लोकांना दिलासा देत सीआरआर, रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता नव्या दरानुसार सीआरआर चार टक्के, रेपो रेट 7.75 टक्के असणार आहे तर रिव्हर्स रेपो रेट 6.75 टक्के असणार आहे.

सीआरआरमध्ये कपात केल्यामुळे कर्जावरील व्याजदर सुलभ होणार आहे. त्यामुळे बँकाही आता कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था ढासळत आहे तर दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्थेत महागाईचं महासंकट कायम आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांना अर्थव्यवस्थेमध्येही सकारात्मक बदल होत असल्याचे हे संकेत आहेत, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.रिझर्व्ह बँकेने रेपो दरांमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे. कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (सीआरआर) पाव टक्क्याने कपात करण्यात आल्याने अर्थव्यवस्थेत सुमारे 18 हजार कोटी रुपये प्रवाही होणार आहेत. रेपो दरांमधील कपातीमुळे गृहकर्ज धारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने प्रमुख रेपो दरांमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली आहे. या निर्णयाची बर्‍याच दिवसांपासून वाट बघण्यात येत होती. अखेर रिझर्व्ह बँकेने आज दरांमधील कपातीचा निर्णय जाहीर केला. 17 एप्रिल 2012 रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अर्ध्या टक्क्याने कपात केली होती. आता करण्यात आलेल्या पाव टक्क्याच्या कपातीमुळे रेपो दर 7.75 टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सीआरआरफमध्ये पाव टक्क्याने कपात केली आहे. त्यामुळे देशभरातील बँकांचे सुमारे 18 हजार कोटी रुपये अर्थव्यवस्थेत प्रवाही होणार आहेत.

चालू आर्थिक वर्षात दोन वेळा रिझर्व्ह बँकेने सीआरआरफमध्ये पाव टक्क्याने कपात केली आहे. आता सीआरआरफ 4 टक्के राहणार असून डिसेंबर 1974 नंतरची सीआरआरफची ही सर्वांत कमी टक्केवारी आहे. प्रमुख रेपो दरांमध्ये रिझर्व्ह बँकेने कपात केल्याने याचा लाभ बँकांकडून ग्राहकांना दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्जासह इतरही कर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचे शेअर बाजारानेही दिमाखात स्वागत केले आहे.तिमाही पतधोरण जाहीर होताच सकाळी 11.05 मिनिटांनी सेन्सेक्समध्ये 41 टक्क्यांची वाढ नोंदवत 20,145 अंशांच्या पातळीला स्पर्श केला. तर निफ्टीमध्येही 18 अंशांची वाढ होत निफ्टी 6093 अंशांवर पोहचला. बँक स्टॉक्समध्ये अंदाजे दोन टक्क्यांची तेजी पहायला मिळाली.

सीआरआरमध्ये कपात केल्यामुळे नऊ फेब्रुवारीपासून गंगाजळीत 18,000 कोटींची अतिरिक्त रक्कम जमा होणार, व्याजदरात कपात केल्यामुळे गुंतवणूक सुधारणार, रिझर्व्ह बँकेने चलनवाढीचा दर 5.5 टक्क्यांवरुन 5.8 टक्के निश्चित केला आहे. महागाई नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने उचलेले महत्वपूर्ण पाऊल, मार्च महिन्याच्या अखेरीस महागाई दर 6.8 टक्क्यांवर आणण्याचे प्राथमिक उदिष्ट ही पतधोरणाची वैशिष्ट्य आहेत.येत्या 19 मार्चला रिझर्व्ह बँक दुसरे पतधोरण जाहीर करणार आहे.

Leave a Comment