‘रेस-२’ कुरघोडी आणि दगाबाजीची

अब्बास – मस्तान दिग्दर्शित रेस 2 हा चित्रपट 2008 सालच्या ’रेस’ चा सिक्वेल आहे. मूळ चित्रपट आणि सिक्वेल यांचा हल्ली फारसा काही संबंध नसतो, तरी त्याला सिक्वेल म्हणायचं असतं, असं बॉलीवूडनं का ठरवून टाकलयं? रेस 2 मध्ये पहिल्या रेसचे अगदीच थोडेफार संदर्भ आहेत; पण दोन्ही चित्रपटांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही. अब्बास – मस्तानच्या चित्रपटात दिसणारा सस्पेन्स आणि ग्लॅमर हा फक्त कायम आहे.

रेस 2 ची नेमकी कथा सांगता येणार नाही मात्र एकमेकांना शह-काटशह देत, दगाबाजी करत आलिशान आयुष्य जगणार्‍या माणसांची गोष्ट म्हणजे हा चित्रपट. कोण कोणाशी किती प्रामाणिकपणे वागतंय, कोणाचा नेमका काय हेतू आहे आणि कोण कुठल्या वळणावर कोणाला कसा धोका देईल, हे सांगता येणं अवघड. रणवीर सिंग (सैफ अलिखान ) आणि सोनिया (बिपाशा बासू) ही पहिल्या भागातली जोडी सायप्रसमध्ये असतानाच सोनियाचा खून होतो. तिच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रणवीर इस्तंबूलमध्ये अरमान मलिकचा (जॉन अब्राहम) शोध घेण्यासाठी येतो. अरमान आलिशान यॉट्स, कॅसिनो, प्रायव्हेट विमान, भव्य महाल यांचा मालक आहे. स्ट्रीट फायटर असलेला अरमान दगाबाजी आणि बुद्धीच्या जोरावर श्रीमंत झाला आहे. त्याला एक सावत्र बहीणही आहे, एलिना (दीपिका पदुकोण), जी त्याच्याच बरोबर राहते आणि ज्याच्या प्रत्येक गुन्ह्यात सहभागी आहे. आरडीएक्स (अनिल कपूर) या पहिल्या भागातल्या पोलीस अधिकार्‍याने रणवीरकडून मिळालेल्या कमिशनमुळे आता नोकरी सोडून हॉटेल टाकलंय. या सर्वांची एकत्र भेट झाली की मग जिंकण्याची आणि शह – कटशहाची रेस सुरू होते.

सस्पेन्स चित्रपट म्हटल की, कथेमध्ये काहीतरी रहस्यमयता यायला हवी; परंतु रेस 2 च्या बाबतीत दिग्दर्शक, पटकथाकार कमी पडले आहेत. मध्यंतरापूर्वीच चित्रपटाचे काय होणार याचा अंदाज प्रेक्षक बांधू शकतील एवढी ढिसाळपणे कथेची मांडणी करण्यात आलेली आहे. ‘रेस’मध्ये दिग्दर्शकाने पत्ते झाकलेले होते इथे मात्र सर्वकाही खुले केल्यामुळे पुढे काय? हा प्रश्‍न प्रेक्षकांना पडत नाही. अरमान मलिक हा किती पोहोचलेला असामी आहे, हे चित्रपटाच्या सुरुवातीच्या निवेदनात येते. त्यामुळे अरमान हा रणवीरला धोबीपछाड देण्याच्या तयारीत असणार, त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा लागणार हे लक्षात आल्याने प्रेक्षक कथेशी बांधून राहत नाही.

अब्बास-मस्तानचे चित्रपट नियमित पाहणार्‍यांची रेस 2’ निराशा करतो. स्टाइलवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करण्याच्या नादात त्यांचं पटकथेकडे दुर्लक्ष झालंय. कथा कशा पद्धतीने सादर करायची, हा दिग्दर्शकाचा विषय असला तरीपण चकचकीतपणासाठी ज्यावेळी तर्काला सोडचिठ्ठी दिली जाते, त्यावेळी प्रेक्षक त्या कलाकृतीपासून दुरावतो हे यानिमित्ताने पुन्हा समोर आले आहे. ‘रेस’च्या यशात प्रितमच्या संगीता महत्त्वपूर्ण भाग होता. रेस 2 मध्ये मात्र तो निराशा करतो. पहिल्या रेस मधली सिग्नेचर ट्यून या चित्रपटातही वापरण्यात आली आहे. सलिम-सुलेमान पार्श्‍वसंगीत कथेला सावरण्याचे काम करते. सायप्रस, तुर्कस्तान, इटली येथील लोकेशन्स नेत्रसुखद आहेत. सैफ अली खानने पहिल्या भागातली अभिनयाची लय कायम राखली आहे. त्याला जॉन अब्राहम चांगली टक्कर देतो. दीपिका पदुकोणने जॅकलीन फर्नाडिसपेक्षा जास्त अंगप्रदर्शन केलंय; पण अभिनयाच्या बाबतीत कोण चांगले हे ठरवण्याच्या फंदात न पडलेल बरं. अनिल कपूर आणि अमिषा पटेल यांच्यातले संवाद पूर्णपणे अश्‍लील आहेत. त्यातून विनोद निर्मितीचा फालतू प्रयोग अब्बास – मस्तानने केला आहे. एकंदरीत ग्लॅमरस लूक असलेला सस्पेन्स थ्रिलर रेस 2 चित्रपगृहात जाऊन पाहायलाच हवा असे नाही,

चित्रपट – रेस – 2 निर्माता – कुमार तौरानी, रमेश तौरानी; दिग्दर्शक – अब्बास मस्तान;संगीत – प्रितम ; कलाकार – सैफ अली खान, अनिल कपूर, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, दीपिका पदुकोण, अमिषा पटेल.

Leave a Comment