मनुष्यबळासाठी भारताची युवापिढी अधिक उपयुक्त: आर्कलेस

दावोस – भारताने ग्रामीण भागात अधिक गुंतवणुक करून तेथील युवापिढीला अधिक सक्षम आणि रोजगाराभिमुख करण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीत आवश्यक बदल करून नव्या पिढीला बाजारातील गरजेप्रमाणे अधिक प्रशिक्षित आणि कौशल्यप्राप्त बनवले पाहिजे; असे मत मॅनपॉवर गटाचे अध्यक्ष डेव्हीड आर्कलेस यांनी व्यक्त केले.

दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी आर्कलेस येथे आले आहेत. ते म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था ही अधिक बुद्धीमान पद्धतीने विकसित होत आहे. जगातील अन्य आर्थिक सुधारणा करणारे देश हे ज्या पद्धतीने प्रगती करीत आहेत त्या पद्धतीपेक्षा वेगळ्यापद्धतीने भारताची प्रगती सुरू आहे. मनुष्यबळाच्या बाबतीत भारताचे युवक अधिक सुशिक्षित आहेत. ते इंग्रजी भाषेचे माहितगार आहेत आणि ते अधिक उपयुक्त आहेत. चीनी युवकांच्या तुलनेत तर भारताच्या युवा पिढीचा हा गुण अधिक उठून दिसतो.लेबर मार्केटच्या दृष्टीने भारताची मोठी क्षमता आहे; असेही आर्कलेस यांनी नमूद केले.

प्रशिक्षित भारतीय युवापिढीच्या संबंधात आपले निरीक्षण नोंदवताना ते म्हणाले की भारतातील युवकांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि त्यांनी स्वीकारलेल्या व्यवसायाचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. तेथे डॉक्टर झालेले विद्यार्थी आयटी क्षेत्रात कार्यरत असतात तर इंजिनअर झालेले लोक सेवा क्षेत्रात कार्यरत असतात. तथापि जगातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची जी गरज आहे त्याचा भारताला खूप लाभ येत्या काही वर्षात होण्याची शक्यता आहे ही बाब ध्यानात घेतली पाहिजे असे त्यांनी नमूद केले. कुशल मनुष्यबळ विकासाच्या बाबतीत भारताने आता अधिक शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न केले पाहिजेत असे ते म्हणाले.

जगातील लेबर मार्केटमध्ये भारताची इंग्रजी शिक्षीत नवी युवा पिढी ही चीनच्या युवकांपेक्षा आधिक उपयुक्त आहे. जागतिक पातळीवर भारतातील युवक अधिक योग्यतेचे आहेत असे येथील प्रख्यात मनुष्यबळ विकास विषयक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment