
नवी दिल्ली – दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला दिले जाणारे नागरी सन्मान आणि वाद हे समीकरण याहीवर्षी उळून आले आहे. खिरापतीसारखे हे पुरस्कार वाटले जात असल्याचा आरोप होत असतानाच, दक्षिण भारतातील सुप्रसिध्द गायिका एस.जानकी यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे.
पाच दशकांच्या गायनाच्या कारर्कीदीत सरकारने पुरस्कार देण्यास बराच उशीर केल्याने आपण हा पुरस्कार नाकारत आहोत असे जानकी यांनी म्हटले आहे. तर यावर्षी ज्या पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली, त्यामधील एकावर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद आहे. छत्तीसगड पोलिस दलाचे आयजी एसआरपी कल्लुरी यांना त्यांच्या उत्कृष्ठ कार्यामुळे राष्ट्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, कल्लुरी यांच्यावर अदिवासी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
75 वर्षीय जानकी यांनी तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेत मिळून 20 हजाराहून अधिक गाणी गायली आहे. सरकारविरुध्द आपली कुठली तक्रार नाही. सरकारने काही चुकीचे केलेय असे मला वाटत नाही. पण मी पद्म पुरस्कार नाकाराण्याचा निर्णय घेतला आहे असे ओटापल्लम येथे आलेल्या जानकी म्हणाल्या.
जानकी यांना गायनासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांसाठी जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये जानकी यांना गायनासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. जानकी यांचा मुलगा मुरली क्रिष्णा म्हणाला की, आईला पद्म पुरस्कार बराच आधी मिळायला पाहिजे होता. पण त्याला बराच विलंब झाला आहे. आम्ही संपूर्ण आदर राखून हा पुरस्कार नाकारत आहोत.
सन 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या कल्लुरींनी लेधाबाई नावाच्या एका महिलेवर बलात्कार तर केलाच शिवाय आपल्याबरोबर असलेल्या इतर पोलिस कर्मचार्यांनाही तसाच आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यांचा समावेश राष्ट्रपती पदकाच्या यादीत कसा काय झाला, याविषयी तर्क सुरु आहेत. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारा सुशिलकुमारही पदकापासून वंचित राहिल्याने, त्यानेही नाराजी व्यक्त केली आहे. भारतात खेळाडूंना नेहमीच सापत्नभावाची वागणूक दिली जाते, असे त्याचे म्हणणे आहे.