‘नवरा माझा भवरा’ चित्रपटाचा आगळावेगळा प्रयोग

मराठी चित्रपटांचे शीर्षक आणि त्यातील गीते हा नेहमीच कुतुहलाचा विषय राहिला आहे. धम्माल शब्दरचना आणि त्याला तितकीच सुरेल संगीताची साथ असलेली ही गाणी अबालवृध्दांच्या ओठी सहज स्थिरावतात. या अस्सल मराठमोळया गाण्यांमध्ये अशी काही जादू असते की तरुणाईदेखील या गाण्यांवर अगदी बेभान होऊन थिरकते. मराठीच्या संगीत परंपरेत नेहमीच निरनिराळे प्रयोग होत आले आहेत.

गोवर्धन चित्र निर्मिती संस्थेच्या आगामी नवरा माझा भवरा या चित्रपटाच्या गीतात असाच प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटातील एका गीतात एक-दोन नव्हे तर तब्बल 40 हून अधिक गाजलेल्या मराठी चित्रपटाची नावे अचूकपणे गुंफण्यात आली आहे. गीतकार राजेश बामुगडे यांनी ही अनोखी किमया साधली असून चपखल आणि तितकेच कर्णमधूर असे हे प्रेमगीत झाले आहे.
‘लपवा छपवी, फसवाफसवी, अशी ही बनवाबनवी, गोंधळात गोंधळ, पोरीचा मामला, सगळी कडे बोंबाबोंब, धुडगूस, हल्ला गुल्ला, प्रेम करुया खुल्लम खुल्ला;’ असे धृपद असलेल्या या गीताला संगीतकार अशोक वायंगणकर यांनी संगीत दिले असून गायक अवधुत गुप्ते आणि नेहा राजपाल यांनी जोशपूर्णरित्या हे गीत गायलं आहे. अभिनेता निलेश साबळे आणि हेमलता बाणे यांच्यावर चित्रित केले आहे.

या गीतात सांगत्ये ऐका, खिचडी, माहेरची साडी, फटाकडी, जाउ तिथं खाऊ, झपाटलेला, लंपडाव, नाथा पुरे आता, बिनधास्त, लाडीगोडी, साडे माडे तीन, गडबड घोटाळा, हयांचा काही नेम नाही, दे दणादण, छक्केपंजे, अगबाई अरेच्चा, श्‍वास, प्रेमासाठी वाट्टेल ते, जबरदस्त, दे धक्का अशा अनेक चित्रपटांच्या शीर्षकांचा समावेश आहे.

निलेश साबळे, तमन्ना नायर, विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, सतीश तारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे या कलाकारांसोबत पाहुण्या भूमिकेतील मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, शर्मिष्ठा राऊत, गिरीजा ओक, शर्मिला शिंदे, आदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले, माधवी निमकर, मेघा घाडगे, सोनाली खरे या लोकप्रिय कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Leave a Comment