वर्धा- स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि गांधीवादी विचारांचे पुरस्कर्ते ठाकूरदासजी बंग यांचे रविवारी (दि.27) वृद्धापकाळाने वर्धा येथील राहत्या घरी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांचे ते वडील होत. त्यांनी खादी आणि सर्वोदया चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.
ठाकूरदासजी बंग यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला होता. भारत छोडो, खादी आणि सर्वोदय चळवळीत ठाकूरदास बंग यांचा सक्रीय सहभाग होता. महात्मा गांधी यांची वर्धा आश्रमात हत्या करण्याचा एक प्रयत्न झाला होता. त्यावेळी नाथुराम गोडसेला अटकही झाली होती. परंतु, गांधीजींनी क्षमा केल्याने त्याला सोडून देण्यात आले होते. या प्रसंगाचे बंग साक्षीदार होते.
जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक असणार्या ठाकूरदासजी बंग यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. गांधींजीच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी भूमिहिनांसाठी भूदान चळवळीत सहभाग घेतला होता.
ठाकूरदासजी यांनी अर्थशास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेत करियर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ते आशीर्वाद घेण्यासाठी गांधींजींच्या आश्रमात गेले. त्यावेळी गांधीजींनी त्यांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाऊ नकोस, ग्रामीण भागात जा, असा सल्ला दिला. गांधींजींबरोबर झालेल्या या भेटीने त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांनी गावात राहून शेतकर्यांच्या अर्थशास्त्राचा अभ्यास सुरू केला.
स्वातंत्र्य चळवळीतील बंग यांच्या योगदानासाठी 1992 मध्ये त्यांना माजी राष्ट्रपती के. शंकरनारायणन यांच्या हस्ते जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर प्रतिष्ठित नाग भूषण या पुरस्कारानेही त्यांचा 2012 मध्ये गौरव करण्यात आला होता.
अभय आणि अशोक बंग ही त्यांची दोन मुले त्यांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. अशोक बंग कृषी क्षेत्रात तर अभय बंग ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करत आहेत. ठाकूरदासजी बंग यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी चार वाजता वर्धा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.