जगातील सर्वात मोठे अंडरवॉटर हॉटेल दुबईत

लंडन दि. २८ – द वॉटर डिस्कस या नावाचे जगातील सर्वात मोठे अंडरवॉटर हॉटेल दुबईत उभारले जात असून यामुळे दुबईतील पर्यटनाला अधिक चालना मिळेल असे हॉटेल मालकांचे म्हणणे आहे. डीप ओशन टेक्नॉलॉजी या पोलिश कंपनीने स्वीस फर्म बीआयजी इन्व्हेस्ट कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने हे काम हाती घेतले आहे.

या हॉटेलची इमारत म्हणजे दोन महाप्रचंड तबकड्यांसारख्या डिस्क असून त्यातील एक पाण्यावर तरंगती आहे तर दुसरी समुद्रपातळीच्या खाली दहा मीटरवर आहे. दोन्ही डिस्क पाच खांबांनी जोडल्या गेल्या आहेत. मधोमध असलेल्या शाफ्ट भोवतीच जिना आणि लिफ्ट आहे. २१ डबलरूम्स आणि बार तसेच डाईव्ह सेंटर येथे असून प्रत्येक रूममधून समुद्री जिवांचे  शक्य तितक्या जवळून दर्शन घेता येते. हे हॉटेल एका जागेहून दुसर्या  ठिकाणीही नेता येते. अर्थात पर्यावरण संबंधी कांही अडचणी आल्या अथवा नैसर्गिक आणीबाणी आली तरच हे हॉटेल दुसरीकडे हलविले जाणार आहे. याच्या वरची डिस्क सुटीही करता येते आणि तिचा आणीबाणीच्या परिस्थितीत लाईफ बोट म्हणून वापर करता येणार आहे.

अर्थात पाण्याखाली उभारले गेलेले हे पहिले हॉटेल नाही. मालदिवच्या रंगाली आयलंड रिसॉर्टचा एक सूट पाण्याखाली आहे तर अमेरिकेत ज्युल्स अंडरसी लॉज हेही पाण्याखालीच आहे असेही सांगण्यात आले आहे. मात्र दुबईतील हॉटेल हे जगातील सर्वात मोठे पाण्याखालचे हॉटेल असणार आहे.

Leave a Comment