कर्नाटक सरकार कार्यकाल पूर्ण करेल – राजनाथसिंग

नवी दिल्ली दि.२८ – येडियुरप्पा समर्थक १३ भाजप आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे अल्पमतात आलेल्या कर्नाटक सरकारला कोणताही धोका नाही. कर्नाटकातील भाजप सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. सोमवारी सकाळी कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी राजनाथसिंग यांची दिल्लीत भेट घेऊन कर्नाटकातील परिस्थितीबाबत चर्चा केली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कर्नाटक मुख्यमंत्री शेट्टर यांनी आपण दिल्लीत राजनाथसिग यांची अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो असा खुलासा केला आहे. मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या शुक्रवारीच राजनाथसिंग यांनी शेट्टर यांना कर्नाटकात भाजप सरकार पडले तरी चालेल मात्र कोणत्याही परिस्थितीत पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत समझौता केला जाऊ नये असे सांगितले होते. त्यासंदर्भात आत्ता राज्यात निर्माण झालेल्या संकटासंबंधीच विचार विनिमय करण्यासाठी या दोन नेत्याची भेट झाली.

भाजपमधून बाहेर पडलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पार्टीची स्थापना केली आहे. भाजपमधील १३ आमदारांनी आमदारपदाचा राजीनामा देऊन येडियुरप्पांना समर्थन दिले आहे. २२५ आमदार असलेल्या विधानसभेत भाजपकडे ११७ जागा होत्या. काँग्रेसकडे ७१, जेडीएसकडे २६, अपक्ष सात तर दोन जाग्या रिकाम्या आहेत. भाजपला स्पष्ट बहुमतासाठी ११३ जागांचीच गरज आहे.

Leave a Comment