चीनच्या टिनजिंग या बिजिंगच्या सिस्टर सिटीत स्टेट बँक ऑफ इंडियाची दुसरी शाखा सुरू करण्यात येत आहे. स्टेट बँकेची चीनमधील पहिली शाखा शांघाय या शहरात २००६ साली सुरू करण्यात आली आहे असे या ब्रँचचे चीफ एक्झिक्युटिव्ह दीनेश शर्मा यांनी सांगितले.
स्टेट बँकेची चीनमध्ये दुसरी शाखा
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की नव्या शाखेत ४७ दशलक्ष डॉलर्सचे भांडवल गुंतवण्यात येणार असून ही शाखा फेब्रुवारीत सुरू होईल. शांघायची शाखा चीनच्या पूर्व भागातील व्यवसायावर लक्ष देऊन सुरू केली गेली आहे तर नव्या शाखेमुळे चीनच्या उत्तर भागावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सध्या भारताची चीनमध्ये होत असलेली निर्यात घटली आहे. त्याचा परिणाम चीनमध्ये कार्यरत असलेल्या तीनही बँकांना म्हणजे स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा आणि बँक ऑफ इंडियावर होणार आहे. भारत चीन दरम्यानचा व्यापार ७४.९ अब्ज डॉलर्सवरून २०१२ मध्ये ६६.४७ अब्ज डॉलर्सवर आला आहे.
भारत चीन व्यापारातील सर्वाधिक हिस्सा स्टेट बँकेकडेच असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. नव्या शाखेतील व्यवहार सध्यातरी डॉलर्समध्येच केले जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. शंघाय शाखेचे व्यवहार २०१० पासून चीनी चलनात होऊ लागले आहेत असे सांगून ते म्हणाले की कॅनरा, इंडियन बँक, युनियन बँक, अलाहाबाद बँक या बँकाही चीनमध्ये व्यवसाय करण्याच्या परवान्याची प्रतीक्षा करत आहेत.