नवी दिल्ली – मुंबई हल्ल्याचा दोषी अजमल आमिर कसाबला फाशी देण्यात आली. परंतु, राष्ट्रीय सल्लागार समितीच्या दोन सदस्यांनी त्याला फाशी देऊन नये, अशी भूमिका घेतली होती. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या समितीच्या अध्यक्ष आहेत. समितीचे दोन सदस्य अरुणा रॉय आणि हर्ष मंदर यांनी कसाबला माफीसाठी राष्ट्रपतींकडे अर्ज केला होता. माहितीच्या अधिकारांतर्गत केलेल्या अर्जाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.
अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर हल्ला केला होता. त्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्लेखोरांपैकी फक्त अजमल कसाब जिवंत हाती लागला होता. त्याच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. परंतु, त्याने राष्ट्रपतींकडे दयायाचिका केली होती. यासंदर्भात राष्ट्रपतींकडे एकूण 203 याचिका आल्या होत्या. त्यापैकी राष्ट्रीय सल्लागार समितीच्या दोन सदस्यांनी कसाबच्या माफीसाठी याचिका केली होती.
जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारांतर्गत काही माहिती गोळा केली आहे. कसाबसाठी माफीची याचिका करणार्या 203 जणांची यादी स्वामी यांनी पत्रकारांना दिली. त्यात राष्ट्रीय सल्लागार समितीतील एक आजी आणि एका माजी सदस्याचे नाव आहे. याशिवाय सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांचेही त्यात नाव आहे.
देशाच्या भविष्यातील जडणघडणात अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार्या एनएसीमध्ये अशा लोकांना समाविष्ट करण्यात येते, यावर स्वामी यांनी टीका केली.