शिंदे यांच्या हिंदू दहशतवाद वक्तव्याबाबत माहिती नाही- शरद पवार

नागपूर दि.२८ –  भाजप आणि संघ परिवाराच्या शिबिरामध्ये हिंदू दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विधानाबाबत आपल्याकडे पुरेशी आणि सत्य माहिती नाही . ही माहिती कदाचित शिंदे यांच्याकडेच असू शकेल असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पुढकाराने नागपूर येथे भरलेल्या अॅग्रोवन कृषी एक्स्पोचे उद्घाटन करण्यासाठी पवार येथे आले होते.

पवार यावेळी बोलताना म्हणाले की राज्यात उसळलेल्या दंगलीत कांही धर्मवेड्या पक्षांचा सहभाग होता असे आपल्या कानावर आले होते, तशी थोडी माहितीही मिळाली होती. मात्र त्याबाबतचे सत्य आपल्याला माहिती नाही. पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना पवार यांनी यावेळी मोकळी उत्तरे दिली. आगामी निवडणकात युपीए युती कायम राहील असे सांगून त्यांनी राहुल गांधी यांच्याशी अधिक संवाद साधण्याची वेळ न आल्याने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत मत व्यक्त करू शकणार नाही असेही सांगितले.

या एक्स्पोचे उद्घाटन करायला तुम्ही कसे आलात, हा तर भाजपचा कार्यक्रम आहे असे विचारले असता ते म्हणाले की मी देशाचा कृषी मंत्री आहे आणि हे कृषी प्रदर्शन आहे. येथे पक्षाचा विचार करून चालणार नाही. तसे मध्यप्रदेशात भाजप सरकार आहे तरीही त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांनाही कृषी क्रांती सन्मान दिला गेला आहे हे लक्षात घेतले गेले पाहिजे.