प्रदर्शनापूर्वीच ‘फँड्री’ची धूम

पुणे: राष्ट्रीय पारितोषिक विजेते निर्माते निलेश नवलाखा यांचा नवीन सिनेमा प्रदर्शनाच्या आधीच अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये गाजत आहे. ‘शाळा’च्या अभूतपूर्व यशानंतर नवलखा यांनी ‘फँड्री’ या सिनेमाची निर्मिती केली आहे, त्यात त्यांना साथ लाभली आहे ती होली बेसिल प्रॉडक्शनचे विवेक कजारिया यांची! नवलाखा आर्ट्स मिडिया एंटरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने फँड्री या सिनेमाची निर्मिती झाली असून सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन ‘पिस्तुल्या’साठी पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे राष्ट्रीय पारितोषिक पटकावणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे याचं आहे.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) साठी फँड्रीची निवड झाली असून ३१ जानेवारी २०१३ रोजी दुपारी २.३० वाजता नेदरलॅण्ड येथे स्क्रीनिंग होणार आहे. ‘प्रोड्युसर्स लॅब’ या ग्लोबल पॅनल चर्चेसाठी ‘फँड्री’चे निर्माते निलेश नवलाखा आणि विवेक कजारिया यांची निवड झाली आहे. आपल्या सिनेमाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा या दोनही निर्मात्यांचा मानस आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर असलेल्या ‘फँड्री’ सिनेमाची उत्सुकता आता अजूनच वाढली आहे हे नक्की.

फँड्री’च्याच जोडीला श्रीपंत प्रॉडक्शन्स आर्ट्सनिर्मित आणि नवलाखा आर्ट्स मिडिया एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘अनुमती’ हा सिनेमा देखील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) येथे ३१ जानेवारी २०१३ रोजी सकाळी ९.३० वाजता दाखविण्यात येणार आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘अनुमती’ या सिनेमाने याआधी कोल्हापूर आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलही गाजवलं आहे. ‘अनुमती’ सिनेमाने कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला असून गजेंद्र अहिरे यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; तर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला आहे. अनुमती या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या बरोबर रीमा, आनंद अभ्यंकर, नेहा पेंडसे, नीना कुलकर्णी, किशोर कदम आदी कलाकार मंडळी आहेत तर छायाचित्रणाची धुरा हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध छायाचित्रकार गोविंद निहलानी यांनी सांभाळली आहे.

२३ जानेवारी पासून सुरु झालेला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल रॉटरडॅम (IFFR) हा फिल्म फेस्टिवल ३ फेब्रुवारी पर्यंत रंगणार आहे. फँड्री आणि अनुमती या दोनही सिनेमांना सादर करणारे निलेश नवलखा हे एक दोन्ही सिनेमातील महत्वाचा दुआ आहेत. जगातील अनेक उत्कृष्ट कलाकृतींचा या फिल्म फेस्टिव्हलमध्ये समावेश असून फिल्ममेकिंग आणि त्यासंबंधी निगडीत विषयांवरील देवाणघेवाण करण्यासाठी हा उपक्रम भारतीय सिनेमांसाठी लाभदायी होईल; अशी प्रतिक्रिया निलेश नवलाखा यांनी नेदरलॅण्डवरून बोलताना व्यक्त केली आहे. आपल्या सिनेमाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा या निर्मात्यांचा मानस आहे.

Leave a Comment