तेलंगणा स्थापनेची कोणतीही डेडलाईन दिलेली नाही – केंद्र

नवी दिल्ली – तेलंगणा राज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही अंतिम मुदत किंवा डेडलाईन दिलेली नाही. सरकारला चर्चेसाठी आणखी काही कालावधी हवा आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.या संबंधात आम्ही सर्व नेत्यांशी चर्चा करीत आहोत. आंध्रच्या मुख्यमंत्र्यांशी आम्हाला चर्चा करायची असून चर्चेची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण केली जाईल, असे त्यांनी म्हटले होते.

गेल्या 28 तारखेला गृहमंत्र्यांनी येत्या महिनाभरात तेलंगणाच्या प्रश्‍नावर तोडगा काढला जाईल, असे म्हटले होते. त्यांनी दिलेली मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे तेलंगणाचे नेते केंद्र सरकारच्या घोषणेकडे डोळे लावून बसले असतानाच केंद्र सरकारने हा विषय पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याने तेलंगणात अस्वस्थता वाढली आहे. केंद्रीय स्तरावर सध्या चर्चेच्या फेर्‍या सुरू असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही त्यात लक्ष घालीत आहेत. तथापी तेलंगणा स्थापनेच्या मुद्द्यावर अद्याप एकमत होऊ शकलेले नाही.

Leave a Comment