गृहमंत्र्यांच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निषेधफेरी

मुंबई: गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘भगवा दहशतवाद’ व ‘हिंदू आतंकवाद’, असे शब्द उच्चारून देशातील १०० कोटी हिंदूंचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. त्यांचीच ‘री’ ओढत राज्याचे गृहमंत्री रा. रा. पाटील यांनी राष्ट्रप्रेमी हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे. हे हिंदूविरोधी कटकारस्थान असल्याचा आरोप करून हिंदुत्ववादी संघटनांनी निषेधफेरी काढली.

काँग्रेस शासनाच्या निषेधार्थ दादर येथे भगवी वस्त्रे परिधान करून हिंदूंनी दादर पश्चिम ते पूर्व अशी भव्य निषेधफेरी काढली. या फेरीमध्ये हिंदू जनजागृती समिती, शिवसेना, हिंदू महासभा, हिंदू राष्ट्रसेना, हिंदू मानवाधिकार मंच, वारकरी संप्रदाय, सनातन संस्था, बजरंग दल, वङ्कादल, वनवासी कल्याण आश्रम पनवेल, हिंदू एक्झिस्टन्स, हिंदू वॉरियर्स, हिंदू धर्मसेवा प्रतिष्ठान आदी हिंदुत्ववादी संघटनांचे एकूण ७०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीत स्वामी विवेकानंद, स्वा.सावरकर, लोकमान्य टिळक आणि भगतसिंग यांच्या प्रतिमा असलेले फलक घेऊन त्या खाली ‘भगवी वस्त्र परिधान करणे आणि ‘देशासाठी लढणे;’ हा आतंकवाद आहे का ? असे प्रश्न शासनाला विचारण्यात आले होते. या फेरीत कोलकाता येथून आलेल्या ‘हिंदू एक्झिस्टन्स’ संकेतस्थळाचे संस्थापक उपानंद ब्रह्मचारी यांची विशेष उपस्थिती होती.

या फेरीच्या सांगता समारोहात विचार मांडतांना प्रसिद्ध लेखक व व्याख्याते दुर्गेश परुळकर म्हणाले की, ‘‘भिवंडी येथे पोलिसांना जाळणार्‍या, ११ ऑगस्टला आझाद मैदानात दंगल घडवणार्‍या, अफजलखानवधाचे चित्र लावण्यास विरोध करणार्‍या, ‘वन्दे मातरम्’ला विरोध करणार्‍यांचा रंग कोणता होता; याचे उत्तर गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी द्यावे.’’

सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी म्हटले, ‘‘सत्ताधारी काँग्रेस राज्यकर्ते कोट्यवधीचा घोटाळे करतात, तर ते पुण्यकर्म; परंतु या देशात राष्ट्रभक्ती करणे पाप ठरवले जाते. राष्ट्रपुरुषांना जे शासन आतंकवादी ठरवते ते आम्हालाही आतंकवादी म्हणणारच आहे.

यावेळी राष्ट्रीय वारकरी सेनेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदू जनजागृती समितीच मनोज खाडये, हिंदू महासभेचे ठाणे अध्यक्ष राकेश हिंदुस्थानी, हिंदू राष्ट्रसेनेचे प्रशांत बडे यांचीही भाषणे झाली.