गडकरी बिनशर्त माफी मागा- आयटी अधिकार्‍यांच्या संघटनेची मागणी

नवी दिल्ली – माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आयकर खात्यातील (आयटी) अधिकार्‍यांविरुद्ध केलेल्या वाद्रग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी या अधिकार्‍यांच्या सर्वोच्च संघटनेने केली आहे. गडकरी यांच्या पूर्ती समूहाला मिळालेल्या संशयित निधीची चौकशी करणार्‍या आयटी अधिकार्‍यांनी गडकरींची हा इशारा म्हणजे या चौकशीतील अडथळा असल्याचे म्हटले आहे.

पूर्ती समूहातील संशयित करचुकवेगिरीचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांना गडकरी यांनी दिलेला इशार्‍याचे वृत्त दैनिकात वाचून आम्हाला मोठा धक्का बसला आहे, असे द आयआरएस असोसिएशन या आयकर अधिकार्‍यांच्या सर्वोच्च संस्थेच्या आज संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे. गडकरी यांचे हे वक्तव्य आमचा अपमान करणारे आहे. करचुकवेगिरीप्रकरणी करण्यात येत असलेल्या मुक्त व निष्पक्ष तपासात अडथळे निर्माण करण्यासाठी हे वक्तव्य करण्यात आल्याचा दावाही संघटनेकडून करण्यात आला आहे.

सुमारे चार हजार सदस्य असलेल्या या संघटनेने राष्ट्रीय स्तरावरील नेत्याकडून वापरण्यात आलेल्या बेजबाबदार भाषेचा निषेध केला आहे. गडकरी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. संघटनेने संबंधित आयकर अधिकार्‍यांना संरक्षण पुरविण्याची मागणीही केली आहे.

24 जानेवारीला नागपुरात बोलताना गडकरी यांनी भाजप सत्तेवर आल्यावर आयकर अधिकार्‍यांना कुणीही वाचवू शकणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. पूर्ती समूहातील उपकंपन्यांविरूद्ध आयकर खात्याची मुंबई, पुणे आणि नागपूरमधील कार्यालये तपास करत आहे. या चौकशीचा भाग म्हणून खात्याने एक फेबु्रवारीला गडकरी यांना व्यक्तीश: हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

Leave a Comment