नारळाच्या शेंडीची किंमत हजार कोटी!

coconut

नवी दिल्ली – नारळाच्या शेंडीची किंमत किती, असा प्रश्न विचारल्यास कदाचित प्रश्न विचारणा-यास वेड्यात काढले जाऊ शकते; परंतु हाच प्रश्न केरळमध्ये विचारल्यास उत्तर येईल अडीच हजार कोटी रुपये! केरळमधून यंदा १०८४ कोटी रुपयांची नारळाच्या शेंडीपासून बनविलेली विविध उत्पादने (कॉयर प्रॉडक्टस) निर्यात केली गेली. येत्या पाच वर्षांत ही निर्यात दुपटीने वाढवून अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट केरळने ठेवले आहे.
नारळशेंडी उत्पादनांचा देशांतर्गत खप सध्या अडीच हजार कोटी रुपयांचा असून, तो येत्या पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपयांवर नेण्याचेही केरळ सरकारचे प्रयत्न आहेत.
केरळचे महसूल आणि नारळशेंडी उत्पादनमंत्री अदूर प्रकाश यांनी ही माहिती दिली.

’लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील देशांकडून शेंडीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यात आणखी वाढच होत असल्याने हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’ असे ते म्हणाले.
’राज्य सरकार आता शेंडीपासून नवी उत्पादने बनविण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी राष्ट्रीय नारळशेंडी संशोधन आणि व्यवस्थापन संस्था (एनसीआरएमआय) स्थापन करण्यात आले आहे. दरमहा एक नावीन्यपूर्ण उत्पादन बनवले जावे, असे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नारळशेंडीच्या उत्पादनांना मागणी वाढेल,’ असे ’एनसीआरएमआय’ चे संचालक अनिल के. आर. यांनी सांगितले.
केरळ सरकार एक फेब्रुवारीपासून सहा दिवसांचा’ कॉयर केरला २०१३ ’ फेस्टिव्हलही भरवणार आहे, अशी माहिती मंत्री प्रकाश यांनी दिली.

नारळशेंडी उत्पादने
पायपुसणी, बैठका, चटया, शोभेच्या वस्तू, झाडू, रग, ब्रश आदी

प्रस्तावित नवी उत्पादने
ध्वनी यंत्रणेसाठी, अंतर्गत सजावटीच्या वस्तू, फॅशन उद्योगासाठी

देशातून केल्या जाणार्याक शेंडीच्या उत्पादनांच्या एकूण निर्यातीपैकी ९९ टक्के निर्यात केरळमधून होते.
२५०० कोटी – नारळशेंडी उत्पादनांचा देशांतर्गत खप
५००० कोटी – पाच वर्षांतील अपेक्षित खप
१०८४ कोटी – २०११-१२मधील निर्यात
२५०० कोटी – २०१६-१७ मधील अपेक्षित निर्यात
४० टक्के – नारळशेंडी उत्पादने अमेरिका, युरोपला निर्यात

Leave a Comment