नवी दिल्ली: मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर ए तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला अमेरिकन न्यायालयाने सुनावलेली ३५ वर्ष कारावासाची शिक्षा अपुरी असून या कटातील सर्व आरोपींना फाशीची सजा व्हावी; असे मत भारताच्या गृह विभागाचे सचिव आर. के. सिंग यांनी व्यक्त केले.
२६/११च्या मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात सहभागी असल्याबद्दल अमेरिकन न्यायालयाने हेडलीला ३५ वर्षाची सजा सुनावली आहे. हेडलीने अमेरिकन न्यायालयात केलेल्या याचिकेमुळे त्याला होणारी देहांताची सजा टळली आणि त्याला भारताकडे प्रत्यार्पणही करता आले नाही. मात्र या कटातील सर्वांना देहांत शासन होणे आवश्यक असून हेडलीचा ताबा भारताला मिळावा; यासाठी पाठपुरावा सुरूंच राहील; असेही सिंग यांनी सांगितले.
हेडली केवळ मुंबई हल्ल्यातील आरोपी आहे असे नाही तर इतर अनेक ठिकाणांची पाहणी करून त्याने अनेक दहशतवादी कृत्य आणि कटात सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्याचा ताबा मिळण्याची भारताची मागणी ग्राह्य असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.