विप्रो या जायंट आयटी कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांचा धाकटा मुलगा रिशाद हा विप्रोचे सीईओपद कधीच भूषविणार नाही असे स्पष्ट केले आहे. सीईओ बनणे हे त्याचे करीयर कधीच नव्हते मात्र कंपनीचा मालक म्हणून त्याचा अधिकार कायम असेल असेही त्यांनी सांगितले. रिशाद प्रमोटर ओनरशीपचे प्रतिनिधित्व करेल असेही ते म्हणाले.वर्ल्ड ट्रेड फोरम परिषदेच्या दरम्यान टिव्ही वाहिनाला मुलाखत देताना प्रेमजी बोलत होते.
३५ वर्षीय रिशाद २००७ साली विप्रोत जॉईन झाला असून तो सध्या बँकींग, वित्तसेवा यातील कंपनीच्या विशेष प्रकल्पांचा बिझीनेस हेड आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची स्ट्रॅटीजी ऑफिसर म्हणून बढती झाली होती. त्याने हावर्ड मधून एमबीए ची पदवी घेतली असून त्यानंतर त्याने कांही काळ बेन अॅन्ड को येथे नोकरी केली होती. अझीम यांच्यानंतर तो सीईओ पदी येईल असा अंदाज उद्योग वर्तुळातून वर्तविला जात होता.
प्रेमजी यांच्याकडे कंपनीची थेट मालकी असून त्यांचा शेअर ३.७ टकके इतका आहे तर अन्य नातेवाईकांकडे ७४ टक्के शेअर विभागलेले आहेत. रिशादकडे कंपनीचे ०.३ टक्के शेअर आहेत. रिशाद कंपनीच्या आय टी व्यत्तिरिक्त असलेल्या अन्य उद्योगांचा म्हणजे लाईटिंग, फर्निचर, ग्राहक उपयोग उत्पादने, आभियांत्रिकी क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांचा सीईओ बनू शकेल असा अंदाजही वर्तविण्यात येत असून कंपनीच्या एकूण महसूलातील १० टक्के महसूल या अन्य सबसिडरी उद्योगातून येत असतो असेही समजते.
दरम्यान प्रेमजी यांची विप्रोचे सध्याचे सीईओ कुरियन यांच्यावर अधिक महत्त्वाची जबाबदारी सोपविली जाईल असे संकेत दिले असून ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बनू शकतात असे सूचित केले आहे.