जगायचं कशाला ?

माणसाला देवाने सर्वात प्रगत प्राणी केले आहे  पण या माणसाला अजूनही जगावे कसे याची कला अवगत नाही. त्याने आपल्या मेंदूचा वापर करून जीवन आरामदायी केले आहे पण तेच आयुष्य सुखी करण्याची कला अजून त्याला पूर्णपणे अवगत झालेली नाही. आपण नेमके कसे जगत आहोत आणि आपल्याला एवढया सुविधा असूनही समाधान का मिळत नाही असा प्रश्न त्याला पडला आहे. सुखाच्या शोधाच्या प्रवासात त्याची वाट हरवली आहे. तो या वाटेवर काही मैल चालतो पण चालून चालून तो पुन्हा त्याच ठिकाणी यायला लागला आहे. बुद्धी असून बुद्धीहीन ठरला आहे.

गंमतीचा भाग म्हणजे सुखाच्या शोधाच्या निमित्ताने त्याला घेरून टाकणारा हा भोवरा त्याने आपल्याच मेंदूने तयार केला आहे. तो त्याने स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकला आहे.  त्याला जगणे चैनीचे करण्यात यश आले आहे पण हे जीवन सुखी करण्याची कला अवगत झालेली नाही. कबिरांनी एका दोह्यात असे म्हटले आहे की, आपण परमेश्वराच्या शोधार्थ सतत भटकत असतो पण शेवटी अनेक वर्षांची भटकंती केल्यानंतर त्याच्या लक्षात येते की ज्या परमेश्वराच्या शोधार्थ आपण एवढे भटकलो तो तर आपल्याच अंतःकरणात होता. त्याला ते जेव्हा कळलेले असते तेव्हा त्याने साठी गाठलेली असते.  

सुखाचे तसेच आहे. ते नेमके कशात आहे याचा शोध घेता घेता माणसाची दमछाक होते. तो आधी पैशात सुख शोधायला जातो. अनेक सुखांचा बळी देऊन तो पैसा कमावतो पण पैसा कमावतो तेव्हा त्याला कळून चुकते की, ज्या सुखासाठी म्हणून त्याने पैसे कमावण्याचा आटापिटा केला आहे ते सुख मुळी त्या पैशांनी मिळतच नाही. त्याला ते समजते तेव्हा मात्र तो पैसा सोडून सुखाच्या मागे जात नाही कारण पैसा ही त्याची गरज  झालेली असते. पैशाने सुख मिळत नाही, सुखासाठी पैसा सोडवत नाही. पैसा कमावता कमावता सुखाचा आस्वाद घेण्यासाठी आवश्यक असलेले शरीरही विकलांग झालेले असते. अशा अवस्थेत काही लोक सुखासाठी देव देव करायला लागतात पण त्यांना देवही भेटत नाही. सारीच शोकांतिका झालेली असते.

माणूस मृगजळामागे धावणार्याे हरणासारखा सुखाच्या मागे धावत चालला आहे. या दोघांत एक फरक आहे. हरिण हा तहान लागल्यामुळे आणि पाणी मिळत नसल्याने त्या पाण्याच्या भासामागे पळत असतो पण माणूस जवळ सुखाची साधने असूनही या सुखाच्या भासामागे पळत असतो. हरिण अज्ञानी असल्याने मृगजळामागे धावतो पण माणूस सर्वात ज्ञानी असूनही त्याला त्या सुखाच्या मृगजळामागे धावताना आपल्या जवळ सुखाची साधने आहेत याची जाणीव होत नाही. लोक देवासाठी तीर्थाटनाला जातात.  तिथे जाऊन देवाचे दर्शन घेतले की पुण्य लागते असे त्याला वाटत असते पण, त्याला हे कळत नाही की आपल्या शेजारी राहणारे अभावग्रस्त लोक अनेक अभावांनी त्रस्त आहेत त्यांची त्या त्रासातून सुटका करणे हे तीर्थाटनापेक्षा मोठे पुण्य आहे.

सुखाच्या आणि आनंदाच्या शोधात फिरणार्या  लोकांना भरपूर भटकूनही सुख मिळत नाही पण, त्यांच्या लक्षात येत नाही की, आपल्या घरात आपण पदोपदी सुख निर्माण करू शकत असतो. आपल्या पत्नीने     केलेल्या कपभर चहाचा एखादा घोट घेताच, ‘वा !’ असे म्हणा बरे. बघू घरात आनंद कसा निर्माण होत नाही ते ? आपल्या दारातल्या गुलाबाच्या झाडाला एक छान फूल आहे आहे, आपल्या परसातल्या पारिजातकाचे झाड फुलांनी डंवरून आले आहे, आपली नातवंडे आपल्याला प्रेमाने आजोबा म्हणून हाक मारत आहेत या सगळ्या घटनांत आपण आनंद शोधायचा ठरवले तर जगण्यात आनंदच आनंद आहे.

एखाद्या घरासमोर त्या घरातल्या सुवासिनीने सुरेख रांगोळी काढलेली असते. ती रांगोळी काढताना ती मनापासून रंगून गेलेली असते. रांगोळी काढून पूर्ण झाली की ती त्या रांगोळीच्या शेजारी उभी राहून ती रांगोळी डोळा भरून पाहते. तिचा तो कलाविष्कार तिला फ्रेश ठेवत असतो. एकदा रांगोळी काढण्याची ती कलासेवा केली की तिचा दिवस आनंदात जात असणारच. आपणही ती रांगोळी पाहून तिच्या कलेला मनापासून दाद दिली तर तिचाही आनंद द्विगुणित होतो आणि आपल्याही आनंदात भर पडते. आनंदासाठी फार दूर जावे लागत नाही. फार सायास करावे लागत नाहीत.

एखादा गरीब मुलगा कष्टाने शिकला आणि चांगला नोकरीला लागला. ही गोष्ट आपल्याही आनंदात भर घालणारी ठरली पाहिजे पण तशी ती ठरत नाही कारण आपण आपले आपलेपणाचे सर्कल आपल्या पुरतेच ठेवलेले असते. ते वाढवले की आपल्या आसपासच्या परिसरात जे काही चांगले घडते ते आपल्याला आनंदित करते. पण आपल्या परिसरातल्या  लोकांच्या आनंदाने आनंदित होण्यासाठी आपले मन स्वच्छ असले पाहिजे. त्यालाच अध्यात्मात चित्तशुद्धी म्हटले आहे. एकदा आपण सर्वांना भाऊ मानले की, सर्वांचा आनंद तोच आपला आनंद होतो. मग नाही आनंदा तोटा अशी आपली अवस्था होऊन जाते. त्यासाठी चित्तशुद्धी गरजेची आहे.