अमेरिकेला अजूनही अल कायदाचा धोका

वॉशिग्टन दि. २४ – दहशतवादी संघटना अल कायदा आणि जगभर वेगवेगळ्या नावाने त्यांच्याशी संलग्न असलेल्या अन्य दहशदवादी संघटना यांच्याकडून अमेरिकेला असलेला धोका पूर्णपणे टळलेला नाही असे व्हाईट हाऊस मधील प्रेस सेक्रेटरींकडून सांगण्यात आले आहे.

गेल्या कांही वर्षात सातत्याने अमेरिकेने अल कायदाचा बिमोड करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यात कांही प्रमाणात यशही मिळताना दिसत आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा खातमा हे त्याचेच फळ आहे मात्र तरीही अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतत सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचे सेक्रेटरी म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी चार वर्षांपूर्वी जेव्हा प्रथम अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हाच अल कायदाच्या बिमोडासाठी अफगाणिस्तान युद्धावर सर्व लक्ष केंद्रीत केले होते. कारण याच भूमीवरून अमेरिकेवर अल कायदाने ९/११ चा हल्ला चढविला होता आणि त्यात ३ हजार नागरिकांचा जीव गेला होता. अफगाणिस्तानची भूमी अल कायदासाठी सुरक्षित स्वर्ग होती. त्यानंतर पाकिस्तानने ही भूमिका बजावली. जगभरात अल कायदा विविध नावांनी कार्यरत आहे आणि त्यामुळे कुठून आणि कधी या संघटना अमेरिकेवर हल्ला करतील याबाबत अधिक सावधानता बाळगणे गरजेचेच असल्याचे आणि अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरात असलेल्या अमेरिकन नागरिकांची सुरक्षा जपण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment