अतिश्रीमंतांना भरावा लागणार अधिक कर

नवी दिल्ली: आगामी अर्थसंकल्पात अतिश्रीमंतांना आकारण्यात येणाऱ्या करात वाढ करण्याचा सरकारचा विचार असल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सूचित केले. मात्र स्थिर करप्रणालीवर आपला विश्वास असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सन २०१३-१४चा अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार सी. रंगराजन यांनी करांच्या दारात वाढ करण्याचा अथवा अतिश्रीमंतांकडून अतिरिक्त करवसुली करण्याचा सल्ला नुकताच दिला होता.

वित्तीय तूट भरून काढण्यासाठी महसुली उत्पन्नात वाढ करण्याचा सरकारवर मोठा ताण आहे. कल्याणकारी योजना अणि विकास कार्यक्रमांसाठी करण्यात येणारा खर्च आणि करवसुलीचे घटते प्रमाण; या कात्रीत सरकार सापडले आहे.

त्यामुळे महसूल वाढविण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारने करात वाढ करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. त्यामुळेच सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता अर्थमंत्र्यांनी सूचित केली. मात्र या अतिरिक्त कराची वसुली कोणत्या श्रेणीतील करदात्यांकडून केली जाईल; हे त्यांनी स्पष्ट केले नही.

Leave a Comment