दहा वर्षानंतर मिळाली रोमँटीक भूमिका: अतुल कुलकर्णी

पुणे: अभिनेता म्हणून विविध प्रकारच्या भूमिका मी केल्या आहेत. चित्रपटात पदार्पण केले तेंव्हा मला रोंमँटीक भूमिका करायची होती. मात्र या भूमिकेसाठे मला तब्बल दहा वर्षे वाट पहावी लागली. प्रेमाची गोष्ट चित्रपटाच्या निमिताने ही संधी मिळाली आहे. हा चित्रपट नाट्यविरहीत असा आम आदमीचा चित्रपट आहे असे विख्यात अभिनेता अतुल कुलकर्णी याने सांगितले.

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या उर्मी फेस्टीव्हल मध्ये अतुल कुलकर्णीच्या आगामी ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटाच्या गीतांची सीडी प्रकाशित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ, दिग्दर्शक सतीश राजवाडे, ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री सागरिका घाटगे, गायिका बेला शेंडे, आशिष शर्मा, उर्मीचे अध्यक्ष राघव अष्टेकर उपस्थित होते.

अतुल कुलकर्णी म्हणाला, ही साधी सरळ प्रेमकथा असून यामध्ये भविष्यात स्त्री – पुरूष संबध कसे असतील याचा वेध घेण्यात आलेला आहे. ही एका प्रगल्भ प्रेमाची कथा आहे. आजच्या तरूणांना भावेल अशा पद्धतीने मात्र कोणताही मेलोड्रामा न करता साध्या पद्धतीने रसिकांसमोर आणली आहे.

यावेळी बोलताना सतीश राजवाडे म्हणाले की; चित्रपटाचा मोठा प्रेक्षकवर्ग हा महाविद्यालयीन तरूण असतो, मात्र बरेचदा या लोकांपर्यंत मराठी चित्रपट पोहचत नाहीत. आम्हाला संगीत प्रकाशनासाठी उर्मीसारखे तरूणाईचा जल्लोष असलेले व्यासपीठ महाविद्यालयाने दिले ही चांगली बाब आहे.

Leave a Comment