गृहमंत्र्यांवर मानहानीचा दावा दाखल

नवी दिल्ली दि.२४ – केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वादग्रस्त विधानानंतर हिंदू समाजाची बेअब्रु केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दिल्ली कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.  व्ही.पी.कुमार यांनी दाखल केलेली ही याचिका मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट अमिताभ रावत यांच्यासमोर सुनावणीसाठी येत असून त्यासाठी २८ जानेवारीची तारीख देण्यात आली आहे.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी जयपूर येथे झालेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या शिबिरात हिंदू दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते असे विधान केले होते. त्याविरोधात याचिका दाखल करताना कुमार यांनी शिंदे यांचे हे विधान आगामी निवडणूका समोर ठेवून अल्पसंख्यांकांची मते मिळविण्यासाठीच केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर त्यातून हिंदू धर्माची बदनामी केली असून हिंदू समाज राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी कारवायांत गुंतलाय असे संकेत दिले आहेत. भगवा दहशतवाद हे वाक्य केवळ चुकीचेच नाही तर खोडसाळपणाचे आणि समस्त हिदूंची बदनामी करणारे असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.